हत्या, जन्मठेप आणि जामीन… संजय राऊत यांनी आरोप केलेले कोण आहेत राजा ठाकूर?; शिवसेनेशी संबंध काय?
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले.
ठाणे : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्यासाठी राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजा ठाकूर यांनी स्वत: संजय राऊत यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात आरोप केल्याप्रकरणी राऊतांविरोधात मानहानीचा खटला भरण्याचा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे. तर राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी राऊतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांच्या आरोपानंतर राजा ठाकूर अचानक प्रकाशझोतात आले आहेत. राऊत यांनी आरोप केलेले राजा ठाकूर नेमके आहेत तरी कोण? याविषयीचा घेतलेला हा आढावा…
एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजा ठाकूर यांचं खरं नाव रविचंद ठाकूर आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. ठाणे-बेलापूर रोड येथील विटावा परिसरात जानेवारी 2011मध्ये दीपक पाटील यांची हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात राजा ठाकूर यांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. 2019मध्ये राजा ठाकूर हे जामिनावर बाहेर आले आहेत.
अटक आणि जामीन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजा ठाकूर फरार झाले होते. त्यांना ऑक्टोबर 2019मध्ये ठाणे क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने येऊरच्या साईबाबा ढाबा येथून अटक केली होती. त्यानंतर राजा ठाकूर यांना जामीनही मिळाला होता.
कबड्डी स्पर्धेचं आयोजन
दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजा ठाकूर यांनी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या निमित्ताने शिंदे पिता-पुत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात आले होते. त्यामुळे राजा ठाकूर अचानक चर्चेत आले होते. आता राऊत यांनी आरोप केल्याने राजा ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
संजय राऊत यांचा आरोप काय?
संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना राऊत यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे.
आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की. ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, ‘सामना’चा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरकडून आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे. @rautsanjay61 #saamanaonline #SanjayRaut pic.twitter.com/PKaFGbgKsf
— Saamana (@SaamanaOnline) February 21, 2023
आरोप फेटाळले
दरम्यान, राजा ठाकूर यांनी राऊत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मी शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांनीच माझ्या पत्नीला महापालिका निवडणुकीत तिकीट दिलं होतं. तेव्हा आम्ही गुंड असल्याचं दिसलं नव्हतं का? असा सवाल राजा ठाकूर यांनी केला आहे.