कोण आहे रिदा राशीद ज्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला?
रिदा राशीद यांनी याआधीही विनयभंगाचे गुन्हे दाखल केल्याचं ट्वीट ऋता आव्हाड यांनी केलंय.
ठाणे : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्यात. ऋता आव्हाड यांनी रिदा राशीद यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा राशीद आहेत तरी कोण, ते जाणून घेऊया. जितेंद्र आव्हाड यांनी मला धरून धक्काच मारला, असा आरोप रिदा राशीद यांनी केला. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे सर्वात आधी पडसाद उमटले ते मुंब्र्यात. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
आरोप करणारी महिला नक्की भाजपची कार्यकर्ती आहे का याचा शोध लावा. त्यांना कधी दिलं होतं पत्र, असा सवाल ऋता आव्हाड यांनी केला. त्या माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन जेवणं जेवताहेत. त्या एकट्याच भाजपच्या कार्यकर्त्या कार्यक्रमात होत्या. दुसरा एकही भाजपचा कार्यकर्ता तिथं नव्हता, असंही ऋता आव्हाड म्हणाल्या.
ऋता आव्हाड यांनी रिदा राशीद या जामिनावर बाहेर असल्याचा दावा केला. रिदा राशीद यांनी याआधीही विनयभंगाचे गुन्हे दाखल केल्याचं ट्वीट ऋता आव्हाड यांनी केलंय. ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केली त्यांच्याकडं मोटिव्ह आहे. छटपूजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा राशीद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या जामिनावर बाहेर आहेत.
राष्ट्रवादी आणि आव्हाडांविषयी त्या आक्षेपार्ह बोलल्या आहेत. या मॅडमला उठसुट गुन्हे दाखल करण्याची सवय आहे, असा आरोप ऋता आव्हाड यांनी रिदा राशीद यांच्यावर केला. आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीनं रिदा राशीद यांचे जुने व्हिडीओ व्हायरल केले.
रिदा राशीद या अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांचे पती असगर राशीद हे व्यावसायिक आहेत. मुंब्र्यातल्या संजयनगरमध्येसुद्धा त्यांचं घर आहे. मुंब्र्यात त्या आर्शिया वेलफेअर फाउंडेशन चालवितात. २०१४ पासून त्या भाजप महिला आघाडीत कार्यरत आहेत. आव्हाड या मतदारसंघातून गेली तीन टर्म निवडून आलेत. त्यामुळं त्यांना बदनाम करण्यासाठीचं हे षडयंत्र असल्याचा आरोप केला जातोय.