डोंबिवलीत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
डोंबिवलीतील उसाटने गावात एका तरुणाची भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित तरुणाने दोन कुटुंबातील वादात मध्यस्थी केली होती, आणि त्यासाठीच त्याला मारहाण सहन करावी लागली.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने चर्चेत येतोय. कारण मारहाण, दरोडा, चोरी, हत्या, दंगल अशा गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं दिसत नाही. त्यातून या अशाप्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. डोंबिवलीच्या उसाटने गावात भर रस्त्यात घडलेल्या घटनेमुळे तर परिसरात दहशतच निर्माण झाली आहे. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला त्याची चारचाकी गाडी रस्त्यात अडवली. त्याला कारमधून खाली उतरवलं आणि बेदम मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे संबंधित तरुणाची चूक तशी काहीच नव्हती. उलट त्याने दोन कुटुंबामधील वाद मिटावा यासाठी मध्यस्थी केली होती. पण त्याने केलेल्या मध्यस्थीमुळे त्याला मार खावा लागला आहे. संबंधित घटनेप्रकरणी आता पोलीस काय तपास करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मुलाने कोणत्या वादात मध्यस्थी केली आणि त्याला का मारहाण झाली? हा देखील तपासाचा विषय आहे. पण तरीही हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने सामोरं जाणं नेहमी योग्य असतं.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीतील उसाटने गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. भररस्त्यात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुण आदित्य मढवी याला कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी आदित्यच्या कारची तोडफोडही केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु झाला आहे.
आदित्य मढवी याने एका कुटुंबीयाच्या वादात मध्यस्थी केली होती. रूमवरुन सुरु झालेल्या भांडण्यात एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबला “तुमच्या मुलीला उचलून नेऊ”, अशी धमकी दिली होती. सर्व प्रकरण मिटवण्यासाठी गेलेल्या आदित्य मढवीला भांडणात मध्यस्थी केली म्हणून चिडलेल्या एका कुटुंबाने आठ ते दहा जणांची टोळी सोबत आदित्यला भररस्त्यात अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आदित्य मढवी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.