एक-दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर
राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे 400 मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोविड (Corona) रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meetign) यावर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे 400 मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
वेगवान लसीकरणाचा फायदा
मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. युके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुन्हा 46 हजारांचा आकडा पार
राज्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तसंच घरच्या घरीच सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना टोपे यांनी महत्वाचं आवाहन केलंय. राजेश टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल.