यांना तर जोड्याने मारले पाहिजे… शेतकरी नेते कोणत्या मंत्र्यावर भडकले?
केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार आहे. आता डबल नाही तर ट्रीपल इंजिन सरकार आहे. शेतकऱ्यांना आश्वासन दिले. आता सत्ता आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे त्याचे काम आहे की नाही?
जळगाव | 22 नोव्हेंबर 2023 : कापूस पिकाला भाव मिळत नसल्याने ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन केली जात आहे. याच विषयावरून शेतकरी संघटनांचे नेते सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. कापूस पिकाला भाव मिळण्याच्या विषयावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा निती आयोगाचे सदस्य रघुनाथ दादा पाटील आक्रमक झाले आहेत. सत्तेत नसताना कापूस भाववाढीसाठी आश्वासने दिली, उपोषणे केली. पण, सत्ता आल्यावर ती आश्वासने हवेत विरली. त्या आश्वासनांचा विसर पडला. त्यामुळे त्या मंत्र्यांना जोडे मारले पाहिजे असा शब्दात रघुनाथ दादा पाटील यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
कृषी केंद्र चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याविरोधात भूमिका मांडण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि निती आयोग समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला.
सत्तेत नसताना गिरीश महाजन यांनी कापसाला भाव मिळावा म्हणून उपोषण केले. आश्वासने दिली. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना त्या आश्वासनांचा विसर पडला. या लोकांना तर जोडे मारले पाहिजे. मात्र, तरीही लोक त्यांच्या आरत्या ओवळता आहेत, अशी टीका रघुनाथ दादा पाटील यांनी केली.
कापूस भाववाढीसाठी त्यांनी उपोषण केलं. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांचे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार आहे. आता डबल नाही तर ट्रीपल इंजिन सरकार आहे. अर्धी राष्ट्रवादी त्यांच्याकडे आहे. असे असताना कापसाला भाव का मिळत नाही हा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषण केलं, शेतकऱ्यांना आश्वासन दिले. आता सत्ता आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे त्याचे काम आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केळी उत्पादक शेतकऱ्यांनीही सरकारने नुकसान भरपाई द्यावी. त्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी आपली भूमिका असल्याचे ते यावेळी म्हणाले.