मुंबई– खंडेरायाच्या जेजुरी तीर्थक्षेत्राचे (Jejuri)संवर्धन आणि परिसर विकासासाठीच्या पहिल्या ट्पप्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी मान्यता दिली आहे. यासाठी 110 कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. तर सातारा (Satara)जिल्ह्यातील औंध येथील यमाईदेवी तळ्याच्या शुशोभीकरणालाही मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते
जेजुरी तीर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन करणे तसेच मंदिराच्या संकुलाचे संवर्धन करतांना या परिसराचाही विकास करणे, भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे, जेजुरी व आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करणे यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात सुमारे 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे जेजुरीत येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे याही या बैठकीला उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे सुशोभीकरणासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम होणार आहे. या तळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावित आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होते. प्रारंभी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरण केले.
राज्यात पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात २१ महापालिकांसह २१० नगरपालिका, नगरपंचायतींच्या आणि ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होणार आहेत. या सगळ्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीने सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत.