Grampanchyat | ग्रामपंचायतींचा संपेना वनवास! 62 वर्षांपासून इमारतीविनाच हाकताय कारभार
Grampanchyat | जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायती, जिल्हा निर्मितीपासून वनवासात आहेत. या ग्रामपंचायतींच्या प्रमुखांना विना इमारतच कारभार हाकावा लागत आहे. तर ज्यांना इमारती आहेत, त्यातील काहींची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे.
शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली | 6 March 2024 : गावाचा कारभार हाकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीला इमारतीच नाहीत. कुठे वाचनालयात तर कुठे भाड्याच्या खोलीत त्यांचा कारभार सुरु आहे. काहींची पडझड झाली आहे. यातूनच गावचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असली, तरी यातील बऱ्याचशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा भोग अजून किती दिवस नशीब आहे, असा सवाल गावाचे पुढारी विचारत आहेत.
भोग काही सरना
जिल्ह्याच्या निर्मितीला 62 वर्षे झाली. जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत आहे. तर 62 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी दिला जातो. जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या इमारती आहेत. मात्र, त्यातीलही 28 इमारती अपूर्णावस्थेत आहेत. त्यांची कामेही रेंगाळली आहेत, तर निर्लेखनासाठी दोन इमारतींचे प्रस्ताव पाठवले आहेत.
निधीसाठी पहावी लागतेय वाट
ग्रामपंचायत हा पंचायतराज व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन आता वित्त आयोगाचे पैसे थेट ग्रामपंचायतींना देत आहे. त्यातून गावची विकास कामे केली जात आहेत. मात्र ग्रामपंचायतींना अजूनही इमारतीसाठी वाट पहावी लागत आहे. त्यांना निधीची प्रतिक्षा आहे.
जिल्हा निर्मितीपासून वनवास
सांगली जिल्ह्याची निर्मिती एक मे 1962 मध्ये झाली असली, तरी तत्पूर्वी दक्षिण सातारा जिल्हा होता. आज जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असल्या, तरी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती या सांगली जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीच्या आहेत. प्रशासनाकडील नोंदीनुसार मिरज तालुक्यातील बुधगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय सर्वांत जुने आहे. संस्थानकालीन दगडी इमारतीमध्ये हे कार्यालय असून ती 1935 ची आहे. मालगाव ग्रामपंचायतीची इमारत जुनी आहे. लोकवर्गणी, स्वनिधीतून इमारती जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या इमारती या लोकवर्गणी, तसेच स्वनिधीतून उभारण्यात आल्या आहेत. यातील बऱ्यापैकी इमारती या जुन्या झाल्या असून त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्यकता आहे.
जत तालुक्यात इमारतींचा दुष्काळ
जत तालुक्यात 23 ग्रामपंचायतींना इमारत नाही. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या जत तालुक्यात सर्वाधिक 23 ग्रामपंचायती स्वतःच्या इमारतीविना आहेत. यामध्ये वळसंग, काराजनगी, कुडणूर, जालिहाळ, अंकलगी, बालगाव अशा काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्याखालोखाल शिराळा, वाळवा तालुक्यात प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. आटपाडी, कवठेमहांकाळ आणि कडेगाव या तीन तालुक्यांत स्वतःची इमारत असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे.
50 इमारती धोकादायक?
जिल्ह्यात 1990 पूर्वी उभारण्यात आलेल्या 50 इमारती आहेत, तर 1976 पूर्वी उभारण्यात आलेल्या तीस इमारती आहेत. त्यामुळे या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्यकता आहे. या इमारतींचे आयुष्य 35 ते 50 वर्षांहून अधिक असल्याने ग्रामपंचायत विभागाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे.