Special Report : बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदासाठी भाजप-शिंदे गटातून ही नाव चर्चेत
इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, असं वाटतं. त्यामुळं याच विषयावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचं निमित्त हे सहकार विभागाच्या बैठकीचं होतं. पण, याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याबरोबर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्रात २० मंत्री आहेत. कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण २३ पदं रिक्त आहेत. त्यामुळं विस्तार अंशतः करायचा की, पूर्ण २३ मंत्रिपदं भरायची, यावर चर्चा झाली.
अमित शाहा यांच्यासोबतच्या बैठकीत शिंदे गट, भाजपमधून कोणाकोणाला संधी द्यायची, यावर खलबत झाल्याचं कळतं. मंत्रिपद वाटपाबाबत कोणाला किती महामंडळ द्याची यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
गायकवाड म्हणतात, म्हणून दिल्ली दौरा
शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळ विस्तारावरून उघडपणे बोलतात. विस्तारावर चर्चा करण्यासाठीचं शिंदे-फडणवीस दिल्लीत गेल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणाले. इच्छुक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, असं वाटतं. त्यामुळं याच विषयावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं.
मंत्रिपदासाठी ही नावं चर्चेत
मंत्रिपदासाठी शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे आणि बच्चू कडू यांची नावं चर्चेत आहेत.
भाजपमध्येही मोठी स्पर्धा आहे. संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयांनी फरांडे आणि सीमा हिरे यांची नावं मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.