छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी! पावसाळ्यानंतर शहरात येणार 1500 टूर एजंट, काय आहे नेमका उपक्रम?
छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम हा साधारण दोन दिवस असतो. हा मुक्काम अधिक वाढवा यासाठी प्रयत्न म्हणून महत्त्वाचं एक अधिवेशन शहरात होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची पर्यटन (Tourism) राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरची (Sambhajinagar) ओळख आहे. देशविदेशातील लाखो पर्यटक इथल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तुंना भेट देतात. जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळावी, याकरिता राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणजे येत्या पावसाळ्यानंतर शहरात जवळपास १५०० टूर एजंट येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरचं हे पर्यटन वैभव जगातील पर्यटकांपर्यंत पोहोचवणाऱ्या संघटनेने राज्य सरकारसोबत नुकताच करार केलाय. या संघटनेचं महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय अधिवेशन संभाजीनगरात आयोजित करण्यात आलंय.
आयटोचं महाराष्ट्रात पहिलं राष्ट्रीय अधिवेशन
भारताचं ऐतिहासिक वैभव जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘द इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स’ अर्थात आयटो ही संघटना काम करते. देशबरातील टूर एजंटांची ही संघटना आहे. या संघटनेचं महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय अधिवेशन हे छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने करावा लागणारा सामंजस्य करार नुकताच मंत्रालयात पार पडला. अधिवेशनासाठी पुढाकार घेणारे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत या करारावर आयटोचे अध्यक्ष राजीव मेहरा आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याकरून स्वाक्षरी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करार
या कारारानंतर चमूतील आयटोचे विजय गोसायन, टुरिझम डेव्हलपमेंट फौंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, नागरी उड्डयन समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी, सदस्य आदित्य वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री मंगलप्रभात लोढा, अतुल सावे यांच्यासह भेट घेतली. येत्या २०२४ या वर्षातील आयटोचे अधिवेशनाचे पालकत्व उत्तराखंड तर 2025 सालचे पालकत्व ओडिशा राज्याने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे अधिवेशन होणार आहे.
पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार
छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम हा साधारण दोन दिवस असतो. हा मुक्काम अधिक वाढवा यासाठी प्रयत्न म्हणून हे अधिवेशन शहरात होणार आहे. अजिंठा वेरूळ आणि देवगिरी व्यतिरिक्त अन्य ऐतिहासिक ठिकाणे या अधिवेशनातील अभ्यंगतांना दाखवली जाणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनागर मधील अन्य पर्यटनस्थळे देखील परदेशी पर्यटकांना सुचवण्यास मदत होणार आहे.