पिंपरी चिंचवड निवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, ‘या’ पक्षाने मागविले इच्छुकांचे अर्ज
पिंपरी चिंचवडच्या शहर काँग्रेसने आज इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले असून शहर कार्यालयात शहराध्यक्ष 10 वाजेपासून अर्ज स्वीकारणार आहे.
रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार होते. त्यामुळे ही निवडणूक भाजपकडून बिनविरोध करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी आमदार महेश लांडगे यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी भाजपनेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या पोटनिवडणुकीत विशेष लक्ष घातलं जात आहे. असे असतांना इच्छुकांची मोठी गर्दी असतांना लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्याची भाजपकडून तयारी सुरू आहे. अशातच कॉंग्रेस पक्षाकडे ही जागा असल्याने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार तयारी सुरू करा असे पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यावरून पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे सांगितले आहे.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी चिंचवड मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागविले आहे.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर आहे.
पिंपरी चिंचवडच्या शहर काँग्रेसने आज इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले असून शहर कार्यालयात शहराध्यक्ष 10 वाजेपासून अर्ज स्वीकारणार आहे.
शहराध्यक्ष कैलास कदम हे इच्छुक उमेदवारांचे येणारे अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार आहे. कॉंग्रेसने केलेली ही तयारी भाजपसाठी बिनविरोध करण्यासाठीची अडचण ठरू शकते.
कॉंग्रेसकडून कोण इच्छुक असणार आहे. हे देखील स्पष्ट होणार आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अद्यापही भाजपने कॉंग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीची कॉंग्रेसने तयारी सुरू केल्याचे बोलले जातं आहे.