खा. सुप्रिया सुळेंवर केलेली टीका भोवली; चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाचे खुलासा करण्याचे निर्देश
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटल्यानंतर हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे पोहोचले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे.
मुंबई : राजकीय ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यावरूनच भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही पाटील यांनी टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. तर पाटील यांना याप्रकरणी राज्य महिला आयोगाने (State Women Commission)खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयावर काढलेल्या मोर्चात चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या असे म्हटलं होतं.
राजकीय ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या असे म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यात जोरदार वादंग झाला होता. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. तसेच हे प्रकरण आता थेट महिला आयोगाकडे पोहोचले आहे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबत चंद्रकांत पाटील यांनी लेखी खुलासा सादर करावा असे निर्देश दिले आहेत. तसेच यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे असे आयोगाने म्हटले आहे.
ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
वक्तव्याचा विपर्यास केला
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटल्यानंतर हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे पोहोचले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांचं संयमी उत्तर
सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संयमीपणे उत्तर दिलंय. ‘आमचं सरकार दडपशाहीचं नाही. विरोधकांना तेही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या वक्तव्यावर बोलावं, तो त्यांचा अधिकार आहे, त्यात गैर काय, मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटलं म्हणून ते बोलले असतील’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा इशारा
राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केलाय. तुमचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे का वयोमानानं असं बोललायत? महिला ही स्वयंपाकघरात गेली तर अन्नपूर्णा असते आणि मसनात गेली तर महाकाली असते , तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांच्या विचाराचं मुंडन महाकाली केल्याशिवाय राहणार नाही, सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याशिवाय पुण्यात पाय ठेवू देणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.