‘महाराष्ट्रात धमक्या देण्याची परंपरा नाही’, रामदास कदम यांनी कुणाला सुनावले?
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा पूर्वीच्या जोशात आणि जोरात होणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा तोच आवाज आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळेल. आझाद मैदानावर शिवसेनाप्रमुख यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी लाखो लोक येणार आहेत.
मुंबई : 13 ऑक्टोबर 2023 | शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा पूर्वीच्या जोशात आणि जोरात होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘एक नेता, एक मैदान, एक झेंडा, एक पक्ष’ अशा पद्धतीने दसरा मेळावा घेत होते. त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत होत. शिवसेनाप्रमुखांचा तोच आवाज आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते (शिंदे गट) रामदास कदम यांनी व्यक्त केला. उद्धवजी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांचे विचार पायदळी तुडवले. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही रामदास कदम यांनी केली.
आझाद मैदानावर शिवसेनाप्रमुख यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी लाखो लोक येणार आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना कोणाची हा निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. शिवसेना हे पक्षाचे नावही एकनाथ शिंदे यांना दिला आहे, असे ते म्हणाले.
न्यायालयाने अध्यक्षांना समजून घ्यावे
विधानसभेत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. हा मोठा निर्णय आहे. भविष्यामध्ये या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यासाठी वेळ लागलेच. कृपा करून न्यायालयाने देखील अध्यक्षांना समजून घेतले पाहिजे असे कदम म्हणाले.
धमक्या देण्यासाठी हा बिहार नाही
विधानसभा अध्यक्ष यांच्यावर रोज टीका केली जाते. टिप्पणी केली जाते. खरं तर एक न्यायाधीश म्हणून त्यांना निर्णय घ्यायचे आहे. इतका वेळ लागेल त्याला तितका वेळ द्यायला पाहिजे. छातीवरती चाकू ठेवायचा आणि ताबडतोब न्याय देतोस की नाही बोल, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धमक्या देण्याची परंपरा नाही. हा बिहार नाही. योग्य वेळेला ते योग्य निर्णय घेतील, असेही रामदास कदम म्हणाले.
महाराष्ट्राची जनतेच्या करमणूक
संजय राऊत दररोज काही न काही तरी बोलत असतात. खरं सांगायचं तर संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक आहे. संजय राऊत यांना कोणीही गंभीर्याने घेत नाही. मी ही घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला.