केंद्राच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ लागू होणार का? मोठी अपडेट
राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिला अर्ज करत आहेत. पण या योजनांसाठी काही निकष देखील आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विषयी चर्चा झाली. राज्य सरकारची ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनच्या माध्यमातून राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिला अर्ज करत आहेत. पण या योजनांसाठी काही निकष देखील आहेत. ज्या कुटुंबात चारचाकी गाड्या आहेत, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरी करत असणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
विशेष म्हणजे ज्या महिला इतर योजनांच्या लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती समोर आली होती. पण आता याचबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेची अंमलबजावणी जसजशी पुढे सरकरत आहे, तसतसं सरकार यामध्ये शिथिलता देत आहे तसेच दुरुस्ती करताना दिसत आहे. आता केंद्राच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनादेखील लाडकी बहीण योजनांचा लाभ घेता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेची अंमलबजावणी कशी सुरु आहे या मुद्द्यावर सादरीकरण करण्यात आलं. यावेळी 6 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
लाडकी बहीण योजनेबद्दल हे ‘6’ निर्णय घेण्यात आले
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
- एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
- केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
- नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
- ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.
जळगाव जिल्ह्यात तब्बल 4 लाख महिलांनी भरले अर्ज
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत 4 लाख 27 हजार 291 महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. 1 लाख 73 हजार 556 महिलांनी ऑनलाईन तर 2 लाख 53 हजार 735 महिलांनी ऑफलाइन अर्ज भरले. जिल्ह्यातील एकूण 7 हजार 672 शासकीय मदत केंद्रांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक जळगाव आणि जामनेर तालुक्यात तब्बल 55 हजारांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. जळगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये महिलांची होणारी गर्दी कमी झाली. कागदपत्रांच्या अटी शर्ती शिथिल केल्यामुळे महिलांची गर्दी कमी झाल्याची तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती आहे. तलाठी कार्यालयांसह सेतू सुविधांमध्ये आता शैक्षणिक दाखल्यांना प्राधान्य दिले जात आहे.