AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, अन्यथा…’ तुकाराम मुंढे यांचा इशारा

सध्या नागपुरात कोरोनाचे 14 रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. (Tukaram Mundhe warns Nagpur Citizen)

'लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, अन्यथा...' तुकाराम मुंढे यांचा इशारा
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 3:02 PM

नागपूर : नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. (Tukaram Mundhe warns Nagpur Citizen)

तुकाराम मुंढे यांनी आज (रविवार 29 मार्च) पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. लॉकडाऊन असताना आणि प्रशासन वारंवार बजावत असतानाही नागरिक खोटं कारण सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत असल्याचं तुकाराम मुंढेनी सांगितलं.

सध्या नागपुरात कोरोनाचे 14 रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही मुंढे म्हणाले.

हेही वाचा : राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे. (Tukaram Mundhe warns Nagpur Citizen)

विशेष म्हणजे नागरिक गर्दी करत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठवता शहरातील विविध भागात पाठवण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

(Tukaram Mundhe warns Nagpur Citizen)