…तर लॉकडाऊन नव्हे, कडक कर्फ्यू लावेन, तुकाराम मुंढेंचा इशारा
"लॉकडाऊन करण्यापूर्वी 2-3 दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊन असेल तर बाहेर पडता येणार नाही", असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावलं (Tukaram Mundhe warn people).
नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (22 जुलै) पत्रकार परिषद घेऊन नागपूरमधील कोरोना परिस्थितीची माहिती दिली (Tukaram Mundhe warn people). “नागरिक नियमांचं पालन करत नाहीत, आजार लपवतात, त्यामुळे नागपुरात मृत्यू वाढले. पण नागपुरात अजूनही परिस्थती नियंत्रणात आहे. मात्र, आजच्या स्पीडने कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला (Tukaram Mundhe warn people).
“नागपूरात लॉकडाऊन करायचं असल्यास 14 ते 15 दिवसांचं करणार, सोबत कर्फ्यू असेल. लॉकडाऊन करण्यापूर्वी 2-3 दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊन असेल तर बाहेर पडता येणार नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावलं.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“नागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. याशिवाय मृत्यूदेखील वाढला आहे. मृत्यूमागील कारण म्हणजे लोक आपल्या आजारपणाविषयी माहिती देत नाहीत. ते लपवून ठेवतात. मृत्यूदर कमी करायचा असेल तर जे कुणी आजारी असतील त्यांनी डॉक्टराला दाखवून निदान करुन घ्यायचं. मात्र, नागरिक प्रामाणिकपणे नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणं जरुरीचं आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी आवाहन केलं.
“लॉकडऊनमध्ये शिथिलता ही आपल्या जीवनाश्यक वस्तूंचा तसेच अर्थव्यवस्थेचा विचार करुन देण्यात आली आहे. या शिथिलतेची नियमवाली आहे. नागरिकांनी ही नियमावली पाळली पाहिजे. दुकानांमध्ये फक्त पाच लोकांना परवानगी आहे. मात्र, पाच ऐवजी दहा जण असल्याचं मी स्वत: बघितलं. फुटपाथवर गर्दी होते. ऑटो रिक्षाला परवानगी नाही, पण तरीही सर्रास सुरु आहेत. दुचाकीवर एकालाच परवानगी असताना दोन ते तीन जण एकाच दुचाकीवर जातात. मास्क वापरलं जात नाही. चारचाकी गाड्यांमध्ये ड्रायव्हर वगळता दोन जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाच ते सहा लोक चारचाकीतून प्रवास करत असल्याचं दिसत आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
हेही वाचा : समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!
“हे जर असंच चालू राहिलं तर आता ज्या वेगाने कोरोना रुग्ण आढळत आहेत त्यापेक्षा आणखी भयंकर गतीने कोरोनाचे रुग्ण वाढतील. याशिवाय मृत्यदरही वाढतील. परिस्थितीत हाताबाहेर जाईल. सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी आपण लोकांपर्यंत पोहोचत होतो. लोक प्रामाणिकपणे आपल्या आरोग्याची माहिती देत होती. मात्र, आज तशी परिस्थितीत कमी होत चालली आहे. त्यामुळेच मी स्वत: रस्त्यावर जात आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
“मी पीपीई किट घालून रुग्णांची विचारपूस करत आहे. मी आणि माझी टीम हे का करतोय? मला वरिष्ठ अधिकारीदेखील सांगतात, तुम्हाला हे करण्याची गरज काय? डॉक्टर आहेत, हे शहर वाचवण्यासाठी मी हे करतोय. प्रत्येक जीव अत्यंत महत्त्वाचा आणि अनमोल आहे. जीवन एकदाच मिळतं. त्याचा सदुपयोग व्हावा. त्यामुळे कोणताही जीव गमवू नये यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. पण या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणार नसेल तर तुम्हाला कुणीही मदत करु शकणार नाही, वाचवू शकणार नाही. स्वत:ला, कुटुंबाला आणि पर्यायाने आपल्या समाजाला वाचवण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळायला हवेत. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे हे गृहित धरुन काळजी घेणं, नियम पाळणं हाच यामागील रामबाण उपाय आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.