Maharashtra Breaking News LIVE 2 January 2025 : सूरज चव्हणांचं बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यावर खोचक ट्वीट
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 2 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्रात सध्या बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी 31 डिसेंबरला वाल्मिक कराड अखेर शरण आला. तोच या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. वाल्मिक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आज सुद्धा या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दरम्यान तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांग्लादेशींना अटक करण्यात आली आहे. तळेगांव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेने ही कारवाई केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये नव्या वर्षाची सुरुवात आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं करण्यात आली. शहरातील महापुरुषांचे स्मारक आणि पुतळे स्वच्छ करण्यात आले. कीर्तीताई जाधव युथ फाउंडेशनद्वारे नव्या वर्षाची अनोख्या पद्धतीनं सुरुवात करण्यात आली.
LIVE NEWS & UPDATES
-
देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 जानेवारीला परभणीत मोर्चा
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत 4 जानेवारीला भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे, सुरेश धस आणि बजरंग सोनावणे या मोर्च्याला उपस्थित राहतील.
-
सूरज चव्हणांचं बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यावर खोचक ट्वीट
अजित दादांच्या ताफ्यात असलेली गाडी आणि वाल्मिक कराड यांनी वापरलेली गाडी ही वेगळी होती. खासदार बजरंग सोनवणे उच्च शिक्षित असल्याने त्यांना नंबर प्लेटमधला फरक समजला नसेल. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्वीट केलं आहे.
-
-
रिक्षाची चोरी करणारा एक आरोपी ताब्यात
जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या आधी मागील पंधरा दिवसापूर्वी एक रिक्षा चोरीला गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केल्यानंतर गुप्त बातमीदार मार्फत ही रिक्षा औंढा नागनाथ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जात आरोपीसह रिक्षा ताब्यात घेतली आहे.
-
दिल्लीत अनिवासी बांगलादेशी रॅकेटचा पर्दाफाश, 4 जणांना अटक
दिल्लीचे सहपोलीस आयुक्त संजय कुमार जैन यांनी सांगितले की, एएटीएसने अवैध इमिग्रेशन बांगलादेशी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आम्ही 2 बांगलादेशी आणि 2 भारतीय नागरिकांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक बिलाल हुसेन आणि तान्या खान नावाचे विवाहित जोडपे आहेत.
-
पिस्तुलासाठी सरपंचाने गाडीवर हल्ला केल्याचा बनाव रचला
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेला हल्ला हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच स्वतःच्या गाडीवर हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
-
-
अमरावतीत पोस्टरवरुन प्रहार आणि भाजपा कार्यकर्त्यांत वादंग
अमरावतीच्या बहिरम यात्रेत भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या फाटलेल्या पोस्टरवरून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटना आणि भाजपा कार्यकर्त्यांत वादंग सुरु आहे.शेकडो कार्यकर्ते अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आहेत.
-
सोलापूर बाजार समितीच्या निवडणूका दोन ते तीन महिन्यात लागणार
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुका पुढील 2 ते 3 महिन्यात लागतील अशी माहिती बाजार समितीच्या माजी संचालकांनी दिली आहे.
-
अवैध धंदे चालू दिले नाही तर मस्साजोगसारखा सरपंच करेन – कोणाला मिळाली धमकी ?
अवैध धंदे चालू दिले नाही तर मस्साजोगसारखा सरपंच करेन , मारहाण करत बुलढाण्याच्या कलंबेश्वरमधील सरपंच पतीला धमकी देण्यात आली. तिघांना मारहाण करत सव्वा लाख रुपयांचा ऐवज हिसकावल्याची, अवैध धंदा करणाऱ्यांनी हल्ला केल्याची तक्रार जानेफळ पोलिसांत करण्यात आली आहे.
-
धनंजय मुंडे यांनी घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
धनंजय मुंडे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी दाखल, नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु. बैठकीतील चर्चा मात्र अद्याप गुलदस्त्यात.
-
पहिल्याच बैठकीत राज्य मंत्री मंडळाचा मोठा निर्णय
पहिल्याच बैठकीत राज्य मंत्री मंडळाचा मोठा निर्णय, राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग, एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी आजच बीडमध्ये दाखल होणार.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग, एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी आजच बीडमध्ये दाखल होणार.
सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली आजच बीडमध्ये येणार असल्याची माहिती. तपासासाठी गठीत करण्यात आलेली एसआयटी आजच तपासाची सूत्रे हाती घेणार.
-
बीडमधील हत्याप्रकरणाचा योग्य रितीने तपास सुरू – धनंजय मुंडे
बीडमधील हत्याप्रकरणाचा योग्य रितीने तपास सुरू आहे. आरोपींना फासावर चढवणे हा आमचा प्रयत्न आहे. तपास वेगाने व्हावा म्हणून सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे – धनंजय मुंडे
-
मंत्रीमंडळ बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर होणार निर्णय
मंत्रीमंडळ बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर निर्णय होऊ शकतो. तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खातं उघडण्यास मंजुरी मिळू शकते.
-
गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक मनपा आयुक्तांचा मास्टर प्लॅन
गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक मनपा आयुक्तांनी मास्टर प्लॅन केला आहे. शहरात तब्बल नऊ एसटीपीसाठी एसटीपी प्लांट तयार होणार आहेत. गोदावरी नदीमध्ये मल जल मिसळू नये यासाठी महापालिका आयुक्त आक्रमक झाली आहे. तब्बल 1800 कोटी रुपये खर्च करून नव्याने नऊ एसटीपी प्लांट तयार करणार. एसटीपी प्लांट सोबत इतरही उपाययोजना करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. येणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी नाशिकची गोदावरी स्वच्छ करण्याचा महापालिका आयुक्तांचा मानस आहे.
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीड प्रकरणावर सविस्तर चर्चा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली असून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाच्या तपासाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
-
बीडचा विषय हा महाराष्ट्रातील कायदा- सुव्यवस्थेच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय- संजय राऊत
“बीडचा विषय हा महाराष्ट्रातील कायदा- सुव्यवस्थेच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन ,तोच निर्णय.. बीडने अनेक खून पाहिले, अनेक खून पचविले. पण संतोष देशमुखच्या हत्येनंतर जी वाचा फुटली त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारला देखील हालचाल करावी लागली. सरकारला असे खून वाचवायची सवय आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
वाल्मिक कराड प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं- आमदार प्रकाश सोळंके
माजलगाव, बीड- “संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 24 दिवस पूर्ण होत आहेत. तरीही मुख्य तीन आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. हे बीड पोलिसांचे अपयश आहे. वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे. मात्र सुर्दशन घुले का सापडत नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना कडक शासन करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे याप्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावे. ही मागणी मी सुरुवातीपासून करत आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
-
पाळधी गावातील दोन गटात वादानंतर नुकसानाची महसूल विभागाच्या पथकाकडून पाहणी
जळगावच्या पाळधी गावातील दोन गटात वादानंतर जाळपोळ करण्यात आली होती. जाळपोळीत झालेल्या नुकसानाची महसूल विभागाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. धरणगाव तहसीलदार यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने आज गावात दोन गटातील वादानंतर जाळपोळ तोडफोडीमुळे गावात झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
दोन गटात वाद झाल्यानंतर समाजकंटकांनी गावातील चार ते पाच दुकानं तसंच काही वाहनं पेटवून दिली होती. आगीत दुकानांमधील साहित्य पूर्णपणे खाक झालं आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानाची महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आलेले आहेत.
-
देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान सहकुटुंब साई दरबारी
देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान सहकुटूंब साई दरबारी पोहोचले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने साई दर्शनासाठी ते साई दरबारी आले आहेत. दुपारच्या मध्यान्ह आरतीला ते उपस्थित होते. दर्शनानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे बाभळेश्वर इथल्या कृषी केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित राहणार आहेत.
-
आरोपींना फाशी द्या
कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात नागरिक आक्रमक दिसले. कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांचे मानवी साखळी बनवत हातात जज साहब बच्ची के हत्यारो को फासी दो अशा आशियाची पोस्टर घेत आंदोलन सुरू केले आहे. आज कल्याण कोळशेवाडीतील अल्पवयीन मुलीच अत्याचार हत्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांची सात दिवसाची पोलीस कोठडी संपत असून त्यांना आज न्यायालयात हजर करणार आहे.
-
ट्रकने दुचाकीला उडवले, एकाच कुटुंबातील तिघे ठार; एक जखमी
नागपूर-चंद्रपूर हायवेवरील ढाब्यावर जेवण आटोपून भद्रावती येथील नातलगांकडे जात असताना, रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने भीषण धडक दिल्याने पती-पत्नी व एक मुलगी ठार झाली, तर एक सात वर्षांची मुलगी जखमी आहे.
-
खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवा
बीड घटनेत न्याय मिळेल का? लोकांना शंका आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. निष्पक्ष काम होण्यासाठी खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवा, अशी मागणी त्यांनी केली.
-
सांगलीत गुळाची मोठी आवक
मार्केट मध्ये गुळाची रोज 50 ट्रक आवक झाली. सणासुदीच्या काळात गुळाला जास्त मागणी आहे. गुळाचा व्यापार सध्या तेजीत असून सुमारे एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल मार्केट मध्ये होत आहे.
-
धनंजय मुंडे आऊट, छगन भुजबळ इन
मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायचे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अजित पवार या प्रकरणात काहीच बोलत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचा एनकाऊंटर
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराड याचा एनकाऊंटर होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
-
स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी मोहीम
नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असतानाच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्य रस्ते व पदपथ यांची सखोल स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे.
-
पोलीस कधी ठाण्यात कॉटवर झोपले नाही- काँग्रेस
वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे. पोलीस ठाण्यात बेड आले. यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात कधी बेड आले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही, असे काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
-
५० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी नाही
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला पाहिजे. धान खरेदीची ३१ तारखेपर्यंत मुदत होती. परंतु अजूनही ५० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही, असे विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.
-
नवी मुंबईत हॉटेलला भीषण आग
नवी मुंबईतील उलवे सेक्टर 5 मध्ये एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. याआगीमध्ये संपूर्ण हॉटेलने पेट घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
अपघातात तीन जणांचा मृत्यू
नागपूर-चंद्रपूर हायवेवरील भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पती-पत्नी व एक मुलगी ठार झाली, तर एक सात वर्षांची मुलगी जखमी आहे. सतीश भाऊराव नागपुरे (५१), मनीषा सतीश नागपुरे (४६) व मायरा राहुल नागपुरे (३, रा. घोन्सा, ता. वणी, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत. तर, स्मायली विजय कामतवार (७, रा. भद्रावती) असे जखमी मुलीचे नाव आहे.
-
जावयाचा नशेत धुंद असलेल्या गुंडाकडून खून
छत्रपती संभाजीनगरात सासुरवाडीच्या कुटुंबातील वाढदिवसासाठी आलेल्या जावयाचा नशेत धुंद असलेल्या गुंडाने छातीत चाकू भोसकून खून केला आहे. रणजीत सुधाकर दांडगे वय 39 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
-
जळगाव पाळधी येथे दोन गटात वाद, संचारबंदी लागू
जळगाव पाळधी येथे दोन गटात वाद प्रकरणी लागू करण्यात आलेल्या संचार बंदीचा आज दुसरा दिवस आहे. पाळधी येथील दोन गटात वाद होवून जाळपोळ झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. पाळधी येथे दोन गटात वाद प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यापैकी सात संशयितांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यत
अलिबाग मधील किहीम समुद्र किनाऱ्यावरील बैलगाडा शर्यत ही कोकणातील सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणात अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर या बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आलं होतं. यंदा या बैलगाडा शर्यतीत एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. आमदार महेंद्र दळवी यांनी सुध्दा बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.
-
पुणे तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांग्लादेशींना अटक
मावळ पुणे तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांग्लादेशींना अटक. तळेगांव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई. तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.
-
कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण, उज्वल निकम विशेष सरकारी वकील
कल्याण अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक. आरोपी विशाल गवळी हा पोलीस कोठडीत असून आज त्याची कोठडी संपत आहे. त्याला पुन्हा एकदा आज कल्याण न्यायालयात हजर करणारं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीने तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले आहे.
-
शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली का?
शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी यांना टाळत माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनातून आपण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकतो असा इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. आपण आता जिल्ह्याच्या ठिकाणी राहून लोकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगत, एक प्रकारे मंत्री संजय शिरसाट यांना इशारा दिला आहे, तसेच संजय शिरसाट यांनी पालकमंत्री आपणच होणार, हा दावा केला आहे. त्याला एक प्रकारे सत्तार यांनी आव्हान दिले आहे.
Published On - Jan 02,2025 8:14 AM