Maharashtra Political News LIVE : शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर
Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 4 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. सकाळी 11 नंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून अर्ज मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभा होणार आहेत. बिहारच्या जमुईमध्ये तर पश्चिम बंगालच्या कूचविहारमध्येही आज मोदींची जाहीर सभा होणार आहे.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
लोकसभा निवडणुकीसाठी ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल
राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.
-
कोस्टल रोडच्या दक्षिण मुंबईकडील बोगद्यात एका कारचा अपघात
मुंबई | कोस्टल रोडच्या दक्षिण मुंबईकडील बोगद्यात एका कारचा किरकोळ अपघात झालाय. अपघातात कोणीही गंभीर जखमी नाही. लर्निंग लायसन्स असलेला तरुण गाडी चालवत होता आणि त्याचे वडील बाजूला बसलेले होते, असं चौकशीत समोर आलंय. संबंधित गाडीवर १५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणात किरकोळ अपघाताच प्रकरण दाखल करुन घेतलं आहे.
-
-
महिला आयोगाची रणदीप सुरजेवाला यांना नोटीस
अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर हरियाणा महिला आयोग कठोर पाऊल उचललं आहे. आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना नोटीस पाठवली आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांना 9 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
-
ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश न्यायालयाने ठेवला राखून
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. 18 एप्रिल रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असताना ब्रिजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
-
देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जग म्हणते की मोदी हे एक मजबूत नेते आहेत आणि मोदी कठोर आणि मोठे निर्णय घेणारे नेते आहेत. मोदी कठोर आणि मोठे निर्णय घेतात कारण मोदींना 140 कोटी लोकांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
-
-
यूपी एटीएसने दोन पाकिस्तानी नागरिकांसह तिघांना केली अटक
यूपी एटीएसने सोनौली सीमेवरून दोन पाकिस्तानी नागरिकांसह 3 संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये पाकिस्तानातील रावळपिंडी येथील रहिवासी मोहम्मद अल्ताफ बट, इस्लामाबाद येथील रहिवासी सय्यद गझनफर आणि जम्मू-काश्मीरमधील रहिवासी नसीर अली यांचा समावेश आहे.
-
बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बीडमधून बजरंग सोनवणे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
-
वर्षा गायकवाड यांचा संजय निरुपम यांच्यावर घणाघात
संजय निरुपम यांनी काँग्रेसबाबत बोलू नये, आम्ही सहन करणार नाही. संजय निरुपम यांचा बोलावता धनी कोण? हे सर्वांना माहितीय. निरुपम यांना काँग्रेसने फार सांभाळून घेतलंय.काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. जे जात आहे ते ed-cbi ला घाबरून जातायत हे सर्वांना माहिती आहे.भाजपला भीती वाटत आहे. ते भ्रष्टाचार ,महागाई ,रोजगार याबाबत का बोलत नाही? ते निवडणुकीत उभे राहिले तर जनता याना निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार. भाजप ला देखील जनता धडा शिकवणार, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
-
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष
अर्चना राणाजगजीत सिंह पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर लागलीच तटकरे यांनी अर्चना पाटील यांना लोकसभेची उमदेवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष पाहायला मिळत आहे. महायुतीचे राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून लाडू वाटून आनंद साजरा केला.
-
महायुतीचा धाराशिवचा उमेदवार आज जाहीर होणार
धाराशिव : धाराशिव लोकसभेतील आमदार व इतर प्रमुख नेते यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांची भेट. भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी मंत्री तथा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील पवारांच्या भेटीला. महायुतीचा धाराशिवच उमेदवार आज जाहीर होणार
-
उमेदवारी न मिळाल्याने खासदार भावना गवळी नाराज
वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह न जाता नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या यवतमाळच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसून राहणं त्यांनी पसंत केलं. यावेळी वाशिम आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते
-
नवनीत राणा उमेदवारी अर्ज करणार दाखल
नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल.यावेळी आदिवासी बांधवांना घेऊन करणार अर्ज दाखल. यावेळी खासदार अनिल बोंडे, प्रवीण पोटे पाटील उपस्थित..
-
आमदार रोहित पवार यांचे मोठे भाष्य
महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना ताकद देण्यासाठी आणि प्रचारसाठी मी इथे आलोय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
-
नवनीत राणा यांचे रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन
नवनीत राणा यांच्या रॅलीला लोकांची मोठी गर्दी ही बघायला मिळत आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह, नावाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह, नावाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. अजित पवार गटाने आणि शरद पवार गटाने दाखल केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी आहे. अजित पवार गट चिन्ह वापरताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, असा आक्षेप घेणारा अर्ज शरद पवार गटाने दाखल केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकलातील शेवटचा परिच्छेद वगळण्यात यावा यासाठी अजित पवार गटाने अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना हे न्यायप्रविष्ठ आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या आदेशाला बांधील आहे , असे प्रत्येक ठिकाणी लिहिण्याचे आदेश दिले होते.
-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात
नाशिक- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राजाभाऊ वाजेंच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर नसताना उद्धव ठाकरे गटाची प्रचारात आघाडी पहायला मिळतेय. नाशिकमध्ये इंडिया आघाडीची पहिलीच बैठक असल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व आहे. या बैठकीत काय रणनीती ठरविली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
-
आप नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाल्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
विजेच्या दरवाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकांना विजेची गरज आहे, पण ती परवडत नाही. अन्नधान्याची महागाई आजवरच्या उच्चांकावर आहे. सर्वच वस्तू महाग होत आहेत. बेरोजगारी वाढत आहे.”
आप नेते संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर त्या म्हणाल्या, “हा खूप मोठा दिलासा आहे. संजय सिंह हे आज संसदेतील सर्वोत्तम सदस्यांपैकी एक आहेत. हा त्यांच्यावर झालेला अन्याय होता.”
-
अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचे निर्देश मागणारी दुसरी जनहित याचिका रद्द
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचे निर्देश मागणारी दुसरी जनहित याचिका स्वीकारण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. युक्तिवादाच्या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने तोंडी निरीक्षणं मांडली की काही वेळा वैयक्तिक हित राष्ट्रीय हिताच्या अधीन असावं लागतं.
-
नवनीत राणा यांना मोठा दिलासा
नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला आहे. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब दिला आहे.
-
संजय निरुपम जाहीर करणार निर्णय
राज्यातील माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी रात्री काँग्रेसने हकालपट्टी केली. सहा वर्षांकरीता त्यांच्यासाठी पक्षाने दार बंद केली आहेत. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. पक्षविरोधातील वक्तव्य आणि पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आज ते त्यांची भूमिका जाहीर करतील.
-
काँग्रेसला अजून एक धक्का
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. “काँग्रेस पक्ष आज दीशाहीन होऊन पुढे चालला आहे. त्यात मला काही गोष्टी खटकतायत. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय” असं त्यांनी म्हटलं आहे.
-
संजय राऊत यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासह बंडखोरांवर हल्लाबोल केला.
-
अलिबागचे नाव बदला
उस्मानाबाद, औरंगाबाद, या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचं नाव बदलावं अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण करण्यात यावे असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले
-
नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणात सुनावणी
नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र विरोधात आनंदराव अडसूळ कोर्टात गेले आहेत. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं रद्द ठरवलं होतं. त्यानंतर नवनीत राणा सुप्रीम कोर्टात आल्या होत्या त्यावर कोर्टानं स्थगिती दिली होती त्यानंतर आज या प्रकरणात निकाल आहे. जर हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला तर राणांना निवडणूक लढवतां येणार नाही. पण जर सुप्रीम कोर्ट म्हणाले की हायकोर्टाचा निकाल योग्य नाही तर मग नवनीत राणा यांना निवडणूक लढवता येऊ शकते.
-
बंडखोर, गद्दार आमच्यासमोर टिकणार नाही
कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे संजय राऊत हे संजय निरुपम यांच्या प्रकरणात म्हणाले. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही.मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकतेय त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
सुवर्णनगरीत सोने-चांदीचा नवीन रेकॉर्ड
देशाची सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दराने ग्राहकांचा घामटा फोडला. चांदीच्या किंमती पण गगनाला भिडल्याने अनेक ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला. जागतिक घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीमुळे भावाने नवीन रेकॉर्ड केला आहे.
-
‘अलिबाग’ शहराचं नाव मायनाक नगरी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
‘अलिबाग’ शहराचं नाव मायनाक नगरी करा, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून केली आहे.
मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाचा दाखला देत नामांतराची मागणी करण्यात आली आहे. अलिबागमध्ये मायनाक भंडारी यांचं भव्य स्मारक उभारण्याची मागणीदेखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
-
राजश्री पाटील यांनी घेतली संजय राठोड यांची भेट
राजश्री पाटील या मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यावर राजश्री पाटील या शिंदे गटाच्या उमेदवार असतील.
-
अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा
अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आजचा मेळावा.
तर आमदार निलेश लंके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांसोबत गेल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार गटाचा मेळावा. या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे मार्गदर्शन करणार
-
भाजपनं शिंदे, अजित पवारांना चारही बाजूने घेरलं – भास्कर जाधव
भाजपनं शिंदे, अजित पवारांना चारही बाजूने घेरलंय. शिंदे गटात गेलेल्या खासदारांची गोची झाली आहे. एकनाथ शिंदेंना मुलाची जागाही जाहीर करता आली नाही – भास्कर जाधवांची टीका
-
पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन
पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे पण उपस्थित आहेत.
-
धाराशिवमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल?
धाराशिव लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आज जाहीर होणार आहे. अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई पक्ष कार्यालयात प्रवेश करणार आहेत. धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला आहे. त्यामुळे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज प्रवेश करतील आणि त्या महायुतीच्या उमेदवार असतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
-
बुलढाण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता
बुलढाण्यात महाविकासआघाडीचे वतीने आज नरेंद्र खेडेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुषमा अंधारे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली आणि जाहीर सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे बुलढाण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं बंदोबस्ताचं नियोजन कसं?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. पुणे शहरात ९३० अधिकारी आणि साडेदहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी शहरातील दहा मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निश्चित केले आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणूक कालावधीत शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. जाहीर सभा, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्ताची आखणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
-
Maharashtra News : काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक – मनीषा कायंदे
काँग्रेस पक्षात महिलांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक गेम केला असल्याचा आरोप. शिवसेना सचिव आणि पूर्व विदर्भ महिला संपर्क नेत्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी हा आरोप केला आहे. विदर्भ दौऱ्यावर आलेल्या मनीषा कायंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
-
Maharashtra News : नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा आज निकाल
नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा आज निकाल येणार आहे. त्याआधी त्या माध्यमांशी बोलल्या. 12-13 वर्षापासून मी संघर्ष करतेय असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आज निकाल माहित पडेल. मुंबई हायकोर्टाच जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल. सुप्रीम कोर्टच आज निकाल देणार आहे.
-
Maharashtra News : प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार भेट
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसचे दिग्गज व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यासाठी गडचिरोलीला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. दरम्यान, भेटीत बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये धानोरकरांना कितपत यश आले हे मात्र कळू शकले नाही. प्रतिभा धानोरकर यांच्या सोबतीला राजुराचे आमदार व काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे होते.
-
Maharashtra News : आयटी हब हिंजवडीत एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय
आयटी हब असलेल्या हिंजवडीत एका फ्लॅटमध्ये चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी-चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मुंबईतील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता प्रशासनाकडून २४ तासांसाठी आणखी एक हजार ५५६ परिचर (अटेंडंट) नेमण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई महापालिका शाळांची सुरक्षा आणखी बळकट होणार आहे
-
अंधेरीत मोगरा नाल्याचे रुंदीकरण
पावसाळ्यात मुंबईतील अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कामाला अजून वेळ लागणार असून यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सब-वेमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम असेल. यावर्षीही अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच पर्याय असणार आहे.
-
सातारा पुण्यात सर्वाधिक टँकर
दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त झाला आहे. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत मिळून ३३४ गावांतील तब्बल सहा लाख ७२ हजार ८०७ नागरिकांना ३६४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक झळ सातारा आणि पुणे जिल्ह्यांना बसत आहे.
-
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी असा नियम
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यास स्वंयअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश घेता येणार आहे.
Published On - Apr 04,2024 7:16 AM