Final year Exam | विद्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न : उदय सामंत
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी नेमकी काय तयारी सुरु आहे, याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली (Uday Samant on Last Year exam).
मुंबई : राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता सध्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर फिजिकली परीक्षा घेणं अवघड आहे. कारण कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे (Uday Samant on Last Year exam).
अंतिम वर्षांच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं अनिवार्य आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परीक्षेसाठी नेमकी काय तयारी सुरु आहे, याबाबत मंत्री उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना माहिती दिली आहे (Uday Samant on Last Year exam).
“15 सप्टेंबरपर्यंत परीक्षाच घेऊ शकत नाही, असं गडचिरोली आणि चंद्रपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितलं आहे. राज्यातील सध्याची कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता फिजिकली परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, अशीच पद्धत अवलंबावी, असा आमचा प्रयत्न आहे. पण आमच्या बोलण्याचा विपर्यास कोणी करु नये. राजकारण होऊ नये. यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढेल”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
हेही वाचा : UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना
“आज कुलगुरुंसोबत चर्चा करुन त्यांच्या इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना सेंटरला बोलावून परीक्षा घेण्यासारखी सध्याची परिस्थिती नसल्याचं मत कुलगुरुंनी व्यक्त केलं आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
“मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करतील. ही समिती उद्या तातडीने कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. आम्ही सोमवारी (31 ऑगस्ट) दुपारी 12 वाजेपर्यंत याबाबत पहिला निर्णय जाहीर करु. 30 सप्टेंबरला परीक्षा घेणं शक्य आहे की नाही याबाबत माहिती देऊ”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
“विद्यार्थी मानसिक दडपणाखाली आहेत. विद्यार्थ्यांना आरोग्याची अडचण होणार नाही, अशा सोप्या पद्धतीने परीक्षा घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणार आहोत. त्यामुळे संभ्रम नसावा. ऑनलाईन किंवा ओपन बुक टेस्ट घेऊ शकता, असं यूजीसीने सूचवलं आहे”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.