Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत
राज्यातील विद्यापीठाच्या जागा शैक्षणिक कामासाठीच वापरल्या जातील. कुणालाही बंगला बांधायला देणार नाही. असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावर सुरू असलेला एसआरए प्रकल्प मी बंद पाडला आहे. भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही. असं झाल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाची कलिनातील ३ एकर वेगळी जागा ही दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी देणार आहोत, अशी माहितीही यावेळी सामंत यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या जागा कुणाच्या घरासाठी नाहीत
राज्यातील विद्यापीठाच्या जागा शैक्षणिक कामासाठीच वापरल्या जातील. कुणालाही बंगला बांधायला देणार नाही. असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. या जागेच्या वादातून अनेक प्रश्न उपस्थित होत होते, त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची भूमिका मांडली आहे.
राज्यपालांचे अधिकार कमी होणार नाहीत
केंद्र सरकारची जी पद्धत आहे, त्याचेच आम्ही अनुकरण करणार आहोत. राज्यपालांचे अधिकार कमी होणार नाहीत. तेच कुलगुरू नेमणार आहेत. ही प्रक्रिया पारदर्शकच असेल, कुणाशी तरी तुलना करून कुलगुरू होणाऱ्यांचा अपमान करू नये, भाजपशासित राज्यांमध्येही प्रकुलपती आहेत असेही सामंत म्हणाले आहेत.
अभिजीत पानसे यांच्याशी राजकीय भेट नाही
अभिजीत पानसे यांच्यासोबतच्या भेटीबाबत बोलताना, अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारने आपला ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे. निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोग जो निर्णय घेईल तो महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.