ठाकरे गटाला आणखी एक झटका, संजय राऊत यांच्या खूप जवळचा पदाधिकारी शिंदे गटात जाणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाला झटका देण्याचं काम सुरुच आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाला झटका देण्याचं काम सुरुच आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतंच नाशिकमध्ये तब्बल 13 नगरसेवकांना फोडलं होतं. हेही असे की थोडं आता एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील ठाकरे गटाचा बडा पदाधिकारी आपल्याकडे वळवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या चर्चांना दुजोरा देणारं वृत्त आता समोर आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय. हे ट्विट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखावर केलेल्या कठोर कारवाईबद्दल आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय असे ओळखले जाणारे खान्देशातील शिवसेनेच्या बड्या पदाधिकाऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून कठोर कारवाई करण्यात आलीय. या बड्या पदाधिकाऱ्याचं नाव भाऊसाहेब चौधरी असं आहे. या कारवाईबद्दल स्वत: संजय राऊत यांनी ट्वीट करत माहिती दिलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे”, असं संजय राऊत ट्विटरवर म्हणाले आहेत.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात जात असतील तर हा संजय राऊत यांच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे. कारण चौधरींनी काही दिवसांपूर्वी राऊतांच्या जामीनासाठी मौल्यवान कामगिरी केली होती.चौधरी हे संजय राऊतांचे जामीनदार होते, अशी देखील चर्चा आहे.
दुसरीकडे सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. आज रात्री साडेनऊ वाजता एका बड्या नेत्याचा शिंदे गटात पक्षप्रवेश होण्याची माहिती आहे. पण नेमका कोणाचा पक्षप्रवेश याबाबतची अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.