सावंतवाडी, सिंधुदुर्ग, दि.4 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सावंतवाडी येथील सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परंतु थांबा…आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू. व्याजसह नाही तर चक्रवाढ व्याजसह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला.
गणपत गायकवाड यांच्या प्रकारणाचा संदर्भ घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार पुन्हा आले तर पुढील प्रजाकसत्ताक दिन साजरा करता येणार नाही. देशात हुकुमशाही असणार आहे. मिंधे यांची गँग आणि भाजपची गँग मुंबईत आहे. तिसरी सिंचन घोटाळ्याची गँग आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर उल्हासनगरमधील आमदार गणपत गायकवाड म्हणतात, मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत. आता मोदींची गॅरंटी मिंधेना पावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनेवर त्यांनी टीका केली. प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांच्या स्वत:साठी ही योजना आहे का ? पंतप्रधान मत्सनिधी योजनेचा लाभ सर्वात जास्त लाभ गुजरातला दिला. कोकणाला किती लोकांना हा लाभ मिळाला ?
आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केले असते तर तुमच्यावर पक्ष फोडायची वेळ आली नसती. मी मोदी यांच्या विरोधक नाही. आम्ही सोबत २५-३० वर्ष राहिलो. परंतु चांगले काहीच झाले नाही, त्यामुळे साथ सोडली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. निवडणूक बाकी आहे. पण मी तुम्हाला भेटायला आलो आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी येईन. त्यानंतर विजयी गुलाल उधळायलासुद्धा येईल.