महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?
शिवसेना कुणाची? व्हीप कोणाचा लागू होणार? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? 16 अपात्र आमदार या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
प्रदीप कापसे, Tv9 मराठी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने गेल्या सुनावणीवेळी मागणी केली होती की, संबंधित प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावे. पण हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का वर्ग करण्यात यावं? याबाबत कोर्टाने ठाकरे गटाच्या वकिलांकडे लेखी स्वरुपात उत्तर मागितलं होतं. ठाकरे गटाकडून लेखी स्वरुपात संबंधित उत्तर सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलंय. त्यानंतर आता 10 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी सात सदस्यीय खंडपीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात सध्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरुय. याबाबत येत्या 10 जानेवारीच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कदाचित सात सदस्यीय घटनापीठाचा विषय मांडतील. त्यावेळी कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरण कोर्टाकडून लिस्ट करण्यात आलंय. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे याबाबत सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची? व्हीप कोणाचा लागू होणार? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? 16 अपात्र आमदार या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगातही सुनावणी
विशेष म्हणजे फक्त सुप्रीम कोर्टच नाही तर या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगातही महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात येत्या 12 जानेवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार-खासदार दिल्लीला जाणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग सर्व आमदार-खासदारांची ओळखपरेड घेऊन धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व घडामोडी सुरु आहेत.