ठाकरे गटाच्या माजी आमदाराने घेतली ‘या’ बड्या नेत्याची भेट, राजकीय चर्चांना उधान
माजी आमदार बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. पण, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी त्यांचा पराभव केला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे घोलप पितापुत्र नाराज होते.
मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराने राज्यातील एका बड्या नेत्याची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. विधानसभेतील पाच वेळा आमदार असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. परंतु, याच पक्ष प्रवेशामुळे तसेच शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्यामुळे नाराज बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला.
राज्यात झालेल्या सत्तातरांमध्ये घोलप पितापुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. तर, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यात देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजितदादा यांना पाठींबा दिला. त्यामुळे ही जागावाटपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार की शरद पवार यांच्याकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
जेष्ठ नेते आहेत म्हणून…
अशातच माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना आमदार योगेश घोलप यांनी सांगितले की. ‘बऱ्याच दिवसापासून शरद पवार साहेबांची भेट घेण्याची इच्छा होती. आज योगायोगाने मी मुंबईत होतो आणि साहेबही मुंबईत असल्याचे कळले म्हणून त्यांची भेट घेतली. कोणतही राजकीय उद्देशाने ही भेट घेतली नाही. पवार साहेब महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आहेत म्हणून भेट घेतली’, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढण्यापेक्षा उद्भव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. मागेही मी त्यांच्याकडूनच लढलो होतो. यावेळीही संधी मिळाली तर तिकडूनच लढेन’, असेही ते म्हणाले. ‘बबनराव घोलप यांनी स्वतःची भूमिका व्यवस्थित मांडलेली आहे त्यावर मी जास्त काही बोलणार नाही.’ असेही त्यांनी सांगितले.
माझे वडील बबनराव घोलप यांची म्हणण्यापेक्षा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेची अशी इच्छा होती की त्यांनी लोकसभा लढावी. पक्षाशी गद्दारी केलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांचा पक्ष प्रवेश हा आम्हाला पटणारा नाही, असेही ते म्हणाले. मात्र, योगेश घोलप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे देवळाली मतदारसंघाची जागा आता कोणाला सुटते याची उत्सुकता आहे.