मुख्यमंत्री शिंदे माफी मागा, ‘त्या’ विधानावरून उद्धव ठाकरे गटाचा ‘हा’ आमदार सत्ताधाऱ्यांना भिडला
विधानसभा सभागृहाची उच्च परंपरा आहे. त्यामुळे कुणी असे वक्तव्य केले आणि त्याविषयी काही निर्णय झाला तर मान्य करतो. पण, संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला. माझे नाव घेतले.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून विधानसभेत गदारोळ झाला. चार वेळा सभागृह तहकूब करून अखेरीस दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. सभागृहात अनेक आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे नेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांनी काही चुकीचे वक्तव्य केले असल्यास त्याची शहानिशा करावी आणि निर्णय घ्यावा अशी मागणी केली. पण, शिवसेना आणि भाजप आमदार अधिकच आक्रमक झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्द्यावर बोलताना ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. ज्या विधिमंडळात ते बसत होते त्या विधिमंडळाला संजय राऊत चोर म्हणाले हे त्यांना शोभत नाही. महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व म्हणून ज्यांना मानता ते आदित्य ठाकरे या सभागृहात आहेत. त्यांना चोर म्हटले.
अजित पवार तुम्हाला चोर म्हटले. भुजबळ यांना चोर म्हटले. भास्कर जाधव यांना चोर म्हटले. नाना पटोले यांना चोर म्हटले हा सभागृहाचा अपमान आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना टोला लगावला.
संजय शिरसाट यांच्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी माफी मागावी अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांच्या संतापात भर घातली.
विधानसभा सभागृहाची उच्च परंपरा आहे. त्यामुळे कुणी असे वक्तव्य केले आणि त्याविषयी काही निर्णय झाला तर मान्य करतो. पण, संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला. माझे नाव घेतले.
या सभागृहाचा अपमान होईल आणि कुणीही गैरउद्गार काढले तरी केवळ कोणाला तरी परवानगी आहे आणि कोणाला तरी मान्यता आहे असे मानता येणार नाही. या निमित्ताने मुख्यमंत्री यांना एक प्रश्न आहे असे ते म्हणाले.
प्रथेप्रमाणे. परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाला चहापानाला बोलावले जाते. त्या चहापानाला आम्ही गेलो नाही. त्यावेळी मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले, आम्ही देशद्रोही आहोत याचा खुलासा व्हावा.
हे मुख्यमंत्री आधी आमच्यासोबत अडीच वर्ष मांडीला मांडी लावून बसले होते आणि तेच आता आम्हाला देशद्रोही म्हणतात याचाही खुलासा व्हायला हवा. त्याविषयी या सभागृहात कुणी काही बोलणार नाही. पण, बाहेरचा सदस्य काही बोलला तर इतका कांगावा करणारा असाल तर सभागृहाच्या नेत्यांनी, मुख्यमंत्री यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.