उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर, ‘भाजपचा राजीनामा द्या…’
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सागर सुरवसे, Tv9 प्रतिनिधी, धाराशिव | 7 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर सडकून टीका केली. ठाकरे गटाचा आज धाराशिवमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर स्वत: नितीन गडकरी आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. नितीन गडकरीजी भाजपचा राजीनामा द्या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उघडपणे केलं आहे. “निवडणुका आल्यावर सबका साथ, मेरा परिवार आणि निवडणूक झाल्या की मेरा दोस्त. त्यांच्या मतलबासाठी भाई और बहनो आणि मतलब पूर्ण झाले की तुमच्याकडे बघत पण नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘…तर लोकशाहीचा मुडदा पडेल’
“कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. 25 वर्ष तुमच्यासोबत राहून मी शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही. तर मग शिवसेनेची काँग्रेस कशी होऊ देणार?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “ही निवडणूक झाल्यावर भाजप पुन्हा सत्तेत आली तर लोकशाहीचा मुडदा पडेल. त्यामुळे तुम्हाला लोकशाहीचा मुडदा पडणारे व्हायचे आहे की नाही हे ठरवायचं आहे. अब की बार, भाजपा तडीपार. मी आज भाजपला तडीपारीची नोटीस देतोय. त्यावर तुम्ही जनता सही करणार की नाही?”, असा देखील सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
‘हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय’
“हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.