‘महिला दिनाच्या कोणत्या तोंडाने शुभेच्छा द्यायच्या? मणिपूरमध्ये जे घडलं ते…’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"जगामध्ये आपला एकमेव देश आपला असा आहे की आपण त्याला माता मानतो. भारत माता म्हणतो. महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण भारत मातेला दिल्या पाहिजेत. या शुभेच्छा घेत असताना महिलांनी माता-बघिणींनी आता फक्त शुभेच्छा घेऊ नका. तुम्ही आता महिषासुर मर्दिनी आणि कालीमातेचं रुप धारण करा", असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
धाराशिव | 8 मार्च 2024 : “आज महाशिवरात्र आणि महिला दिवसही आहे. हॉटेलमधून निघताना पाचही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आले होते. महिलाही आल्या होत्या. दोन शब्द बोलावे लागतातच. मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा या आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या? मणिपूरमध्ये जे काही घडलंय ते आता बोलूही शकत नाही. आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटू त्यांनी न्यायासाठी टाहो फोडला. पण त्यांची दखल कुणी घेतली नाही. अनेक ठिकाणी आजही महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या कोरड्या शब्दांत शुभेच्छा द्यायच्या”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांना महत्त्वाचं आवाहन केलं.
“महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणजे मी नेमक्या काय शुभेच्छा दिल्या? आम्हाला तरी काय मिळतंय आणि तुम्हाला तरी काय मिळतंय. म्हणून मी केवळ राज्यातल्याच नव्हे तर देशातील तमाम माता बघिणींना हात जोडून विनंती करतोय. मी काल तुळजा भवानीचं दर्शन घेतलं. योगायोगाने इथे येताना कालीमातेचं मंदिर आहे. मी महिलांना हात जोडून विनंती करतो, आम्ही संघर्षाला उतरलोय. जगामध्ये आपला एकमेव देश आपला असा आहे की आपण त्याला माता मानतो. भारत माता म्हणतो. महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण भारत मातेला दिल्या पाहिजेत. या शुभेच्छा घेत असताना महिलांनी माता-बघिणींनी आता फक्त शुभेच्छा घेऊ नका. तुम्ही आता महिषासुर मर्दिनी आणि कालीमातेचं रुप धारण करा. जो हुकूमशाह, जी हुकूमशाही माझ्या भारत मातेला गिळायला निघाली आहे त्या हुकूमशाह सुराला खत्म करा. तरंच महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता म्हणून आम्हाला आशीर्वाद देऊ शकाल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘वाघ विरुद्ध लांडगे अशी ही लढाई’
“लोकसभा आणि विधानसभेची लढाई ही फक्त पक्षांची नाही. तर वाघ विरुद्ध लांडगे अशी आहे. तु्म्ही कोण आहात? बेईमानी विरुद्ध इमानदार, तुम्ही कोण आहात? गद्दार विरुद्ध निष्ठावान, तुम्ही कोण आहात? संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचं आहे. गद्दारी, बेईमानी ही उद्धव ठाकरेशी किंवा शिवसेनेशी नाही तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी तुम्ही करणार आहात. तुम्ही म्हणजे जे इमानदारीच्या बाजूने राहणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.