गौप्यस्फोट आणि फटकेबाजी, ’23 तारखेला गुवाहाटीचं तिकीट पाहिजे’, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय-काय म्हणाले?
"आमची मशाल पेटली की सर्वांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी मशाल पेटली आहे. तोबा गर्दी होते. लोकं वाट पाहत आहेत. त्याने जो गद्दारीचा वार केला तो केवळ शिवसेनेवर केला नाही, आपल्या आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर केला", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सांगोल्यात सभा पार पडली. सांगोल्याचे उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी ही सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्यावर प्रचंड टीका करत जोरदार फटकेबाजी केली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीवेळी आपण दीपक आबा साळुंखे यांनाच तिकीट देणार होतो, असा गौप्यस्फोट यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. “मी दीपक आबांना सांगतो, तुम्ही इथल्या तालुक्यांच्या समस्यांचा पाढा वाचलात. पण हे निवेदन मी हातात घेणारच नाही. तुम्ही आमदार होऊन विधीमंडळात आलात तर आणि तरच मी हे निवेदन घेणार. आता तुमच्यावर आहे, दीपक आबांना पाठवायचं की नाही. तुम्हाला पाठवावंच लागेल. मला सांगा रेल्वेत कुणाची ओळख आहे का? नाही, तिकीट पाहिजे. 24 तारखेचं एकच तिकीट पाहिजे, ते सुद्धा गुवाहाटीचं. परत जाऊद्या त्यांना. काय झाडी, काय डोंगर…, बसा तिकडे झाडं मोजत बसा”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“प्रत्येकाचं एक नशिब असतं. देव संधी देत असतो. त्या संधीचं सोने करायचं की, माती करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. गेल्यावेळी आपण एका गद्दाराला उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. पण त्याने संधीचं सोनं नाही तर आयुष्याचं मातेलं केलं. किती माज म्हणजे माज असायला पाहिजे? ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना ते माहिती नव्हतं की हे सगळेच जण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. मी आलोय, त्यांचा माज उतरवायला, गद्दारांना गाढायला आलो आहे. मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावर पुन्हा एकदा भगवा रोवायला आलो आहे. अरे गद्दारांना काय वाटलं? ते गद्दार म्हणजे सर्व लोकं गद्दार? महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तिथला डोंगर तू पाहिलास, 23 तारखेला रायगडाचं टकमक टोक दिसणार’
“या गद्दाराला सांगायचं आहे, तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस. ते तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरुन हे सर्वजण तुझा कसा राजकीय कडेलोट करतील ते बघ. मग तुझी जी काय मस्ती होती… काय नव्हतं दिलं? सर्व दिलं होतं. मी प्रमाणिकपणाने सांगतो, मी गेल्यावेळीच दीपक आबांना उमेदवारी देणार होतो. तसं आपलं बोलणंही झालं होतं. पण मध्येच एक धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहिती आहे, त्याने सांगितलं की, साहेब माझं ऐका. हा शंभर टक्के निवडून येतोय. मी म्हटलं, ठिक आहे. मी दीपक आबांना विनंती केली की, साहेब जरा माफ करा. असं असं मला करावं लागत आहे. त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतंय की, त्यांना सांगितल्यानंतर लबाडी केली नाही. गद्दारी केली नाही. ते म्हणाले, ठिक आहे, उद्धवजी मी निवडून आणतो. असा शिवसैनिक पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. याला म्हणतात सैनिक”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं.
‘गद्दाराने आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर वार केला’
“आता त्यांनी सांगितलं ना, किती वर्षे थांबलं होतं. आता झालं. त्यांच्यामागे किती स्पीड ब्रेकर होते ते आपण सपाट केले आहेत. एक ढेकुळ आहे ते देखील आपण सपाट करुन टाकायचं आहे. आता निवडणूक रंगात यायला लागली आहे. साधरणत: एक आठवड्यापूर्वी मला पत्रकारांची फोन येत होते. म्हणाले की, यावेळी लोकसभेसारखं वातावरण गरम होताना दिसलं. मी म्हटलं थांबा जरा. आमची मशाल पेटली की सर्वांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी मशाल पेटली आहे. तोबा गर्दी होते. लोकं वाट पाहत आहेत. त्याने जो गद्दारीचा वार केला तो केवळ शिवसेनेवर केला नाही, आपल्या आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर केला”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.