‘आता त्यांनी माझी बॅग ऑटो चेकिंगला टाकली दिसलो की’.., उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते श्रीगोंद्यात बोलत होते.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान त्यातच निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे हे आज प्रचाराच्या निमित्तानं अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीगोंदामध्ये बोलताना याच मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता सत्ताधारी देखील म्हणतात माझी बॅग तपासा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उशीर झाला त्याबद्दल दिलीगिरी व्यक्त करतो, तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरु आहे लोक बिर्याणी खातात आणि निघून जातात. साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला नाही तर अनुराधा नागवडे यांना तिकीट द्या म्हणाले. माझी बॅग ऑटो चेकिंगला टाकली आहे, उद्धव ठाकरे दिसले की बॅग तपासा, बरं झालं माझी बॅग तपासतात त्यामुळे मला देखील फोटो काढायला मिळतात. आता मला प्रसिद्धी मिळाली आहे, त्यानंतर सत्ताधारी देखील म्हणतात माझी बॅग तपासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बॅग तपासली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले कोण आहेत आणि आपल्यात घुसलेले शकुणी मामा कोण आहेत हे ओळखलं पाहिजे. निलेश लंके यांना देखील सांगतो भेदभाव न करता तुम्हला जसं लोकसभेत पाठवलं, तसं श्रीगोंद्यात येऊन अनुराधा नागवडे यांचा प्रचार केला पाहिजे. अनुराधा ताई तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, मात्र तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर गद्दारी होत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी सहकार खातं काढलं आणि स्वत:च्या बुडाखाली ठेवलं. आता अमित शहा यांना मुंग्या लागणार, तुमचे साखर कारखाने आजारी पाडले जाणार. आम्ही महिलांना दीड हजार नाही तर 3 हजार देऊ, महिलांना सुरक्षा देऊ, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे काढू महाराष्ट्र जर मोदी आणि शहा यांच्या हातात जात असेल तर शेतकऱ्यांप्रमाणेच आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या यांना एकदाच गाडा आणि आपल सरकार आना, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.