पुणे, दि. 5 जानेवारी 2024 | राज्यातील काही भागात नवीन वर्षात पहिला पाऊस पडला. हिवाळा सुरु असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडणार आहे. पुणे हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पावसाची शक्यता आहे.
सांगली शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे थेंब पडले. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या परिसरासह इतर गावात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. मका आणि गहू तर अक्षरशः झोपला आहे. यापूर्वीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा या भागातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाताचा गेला आहे. दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी हंगामात शेतकऱ्याने लागवड केली. पिकांना रात्रंदिवस जागून खते आणि पाणी दिले. आता पीक हातातोंडाशी आलेला असताना निसर्गाने घास हिरावून घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.