लखनौ: आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामागे (Ayodhya Visit) नेमकं काय कारण आहे? आपलं हिंदुत्व (Hindutwa) ठसवून सांगण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, अशी चर्चा करणाऱ्यांना आणि विरोधकांना संजय राऊतांनी (Sanjay Raut) चांगलाच जाब विचारला. आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही काय युनिव्हर्सिटी उघडली आहे का? विरोध करणाऱ्यांची आडनावं पोटदुखे आहेत. आम्ही काहीही केलं तरी त्यांच्या पोटात दुखतं. पण आम्ही, आमचा अंतरात्मा, कार्य हेच आमचं हिंदुत्व काय आहे ते ठरवेल. एखाद्या पक्षाची साथ सोडली असेल. पण हिंदुत्वाला सोडून राजकीय स्वार्थासाठी खुर्चीसाठी आम्ही राजकारण केलं नाही. त्यामुळे कोण काय बोलतंय, हे पहायची गरज नाही, हे नकली लोकं आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांना सुनावलं. तसेच भाजपने काश्मीरमध्ये मेहबुबा मुक्तीसोबत गेलेलं चाललं. राम मंदिरबाबत संघाला खतम करण्याची भाषा केली. पण राजकीय सोयीसाठी बदललेल्या भूमिका आणि परत चुंबाचुंबी … हे राजकारण आम्ही केलेली नाही, असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं.
1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी शिवसेनेनं जी भूमिका घेतली होती, तिच्या आठवणी इथे आजही जिवंत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘आज अयोध्येतील असंख्य लोकांनी शिवसेनेच्या 1992मधील आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या. त्यामुळेच आदित्य ठाकरेंनी येथे महाराष्ट्र सदन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या भूमीशी जे नातं आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे. 1992 मध्ये आंदोलनात शिवसैनिक आले होते. आजही बाळासाहेब ठाकरेंची येथील जनता, साधू संत आठवण काढतात. त्या आंदोलनातील शिवसेनेचे लोक आठवणी सांगतात.. शिवसेना काय होती, याचे जिवंत पुरावे येथे आहेत. या परिसरात महाराष्ट्राची एक वास्तु असावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी ती स्वीकारली. आदित्य ठाकरेंशी चर्चा झाली. सरकारतर्फे यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या सरकारशी संवाद सुरु झाला आहे. अयोध्येशी महाराष्ट्राचं नातं दर्शवणारी ही वास्तु असेल. दिल्लीतही अशी वास्तु आहे. इतर राज्यांना अयोध्या विकास प्राधिकरणच्या माध्यमातून जशा जमिनी दिल्या आहेत, तशी महाराष्ट्राला नक्कीच मिळेल’, अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी परिवाराची ईडीतर्फे चौकशी सुरु आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ देशातल्या विरोधी पक्षांचा छळ करण्याचा प्रयत्न आहेत. अनेकांना हा त्रास सहन करावा लागतोय. पण या दडपशाहीपुढे आम्ही झुकायला तयार नाहीत. तुरुंगात टाकाल.. बेड्या घालायला तयार आहोत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी फार पुढाकार घेऊ नये.. म्हणून भाजपची ही खेळी आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
राष्ट्रपती निवडणुकीच्या चर्चेसाठी भाजपचा प्रस्ताव आला तर शिवसेना तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. चर्चेसाठी शिवसेनेनं कधीच दरवाजे बंद केलेले नाहीत. फक्त राष्ट्रीय प्रश्न असेल तर आम्ही कधीही खालच्या पातळीवर राजकारण करत नाहीत, असं ही राऊतांनी स्पष्ट केलं.