‘डीपी धांसू, चित्रा सासू’, तोकड्या कपड्यांवरुन सुरु झालेला वाद थांबेना, उर्फी जावेद हिने पुन्हा डिवचलं
मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबता थांबत नाहीए. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलंय.
मुंबई : मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबता थांबत नाहीए. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलंय. उर्फीनं केलेलं ट्विट, उर्फीवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु झालेला वाद, त्या वादात सुप्रिया सुळेंनी मारलेली उडी यामुळं प्रकरण अधिकच चिघळलंय. कधी चित्रा वाघ जी, कधी चित्रू, तर कधी सासू, मॉडेल उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना ट्विट करुन डिवचलं. आणि चित्रा वाघ यांच्या संतापाचा पारा पुन्हा चढला. काही दिवसांपूर्वी उर्फीनं हा नंगानाच सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. नंतर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला कपड्यांची अॅलर्जी असल्याचा दावा केला होता. कपड्यांची अलर्जी असल्याचा दावा उर्फीनं केल्यानंतर चित्रा वाघ यांनी अॅलर्जीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिलाय.
एकीकडे उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर यांच्यातही संघर्ष सुरु झालाय.
महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांचा अभ्यास कमी पडत असल्याचं वक्तव्य चाकणकरांनी केलं होतं.
चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातला वाद थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना आवाहन केलं होतं. त्यालाही चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर उर्फी जावेद ठाम आहे. उर्फीला धडा शिकवण्यावर चित्रा वाघ ठाम आहेत. आणि चाकणकर-वाघ यांच्यातल्या वादात माघार घ्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळं उर्फीचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हेच पाहावं लागेल.