शैक्षणिक संस्थेच्या निवडणूकीत काळ्या जादूचा बोलबाला, विरोधकांच्या घरात टाकल्या भारलेल्या बाहुल्या
शैक्षणिक संस्थांच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराने चक्क विरोधी गटाच्या उमेदवाराच्या घरात जाऊन त्यांच्या सोफ्यात तंत्र आणि मंत्र भारीत बाहूल्या लपविल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
निलेश डाहाट, चंद्रपुर | 28 ऑक्टोबर 2023 : एकीकडे राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा पास झाला आहे. राज्य पुरोगामी विचारांचे असल्याचे म्हटले जात असताना दुसरीकडे निवडणूकांत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत एका उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरातील सोफ्यात तंत्र आणि मंत्राने भारलेल्या बाहुल्या ठेवल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे बिंग सीसीटीव्हीच्या तपासात फुटल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळी जादू केल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कै. बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या विरोधी गटाच्या उमेदवाराच्या घरात जाऊन त्याच्या सोफ्यात मंत्राने भारलेल्या बाहुल्या लपविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच सीसीटीव्ही तपासले असता ही गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुनदोषीवर कारवाई करण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवाराने घरात येऊन केला प्रकार
राजुरा शहरात शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीत प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवारांनी भारलेल्या बाहुल्या आणि हळद-कुंकू लावलेल्या वस्तू टाकल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अद्यापही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ऐन निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवार घरी आल्याने हा उमेदवार बुचकळ्यात पडवा होता. विरोधी गटातील उमेदवार परत गेल्यानंतर सर्व उमेदवारांच्या घराच्या सोफ्यामध्ये दडविलेल्या मंत्र भारीत बाहुल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानूसार कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार प्राचार्य डॉ. संभाजी वरकड आणि अंनिस कार्यकर्ते अनिल दहागावकर यांनी केली आहे. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात होणारा विलंब देखील भुवया उंचावणारा ठरला आहे.