‘भाजपचे जे काही जुने प्लॅन…’, अमित शाह अन् भाजपवर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा हल्ला
घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कोणी केला असेल तर तो भाजप या संघटनेने केला आहे. लोकसभेत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्यातून त्यांची जुनी मानसिकता बाहेर पडलेले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाला घेरले. अमित शाह यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी संघ, भाजप अन् अमित शाह यांच्यावर घणाघाती हल्ला केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी आता जन्मला आला आहे. त्यांच्या आधी जनसंघ होता. त्याच्या आधी आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) होते. घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कोणी केला असेल तर तो या संघटनेने केला आहे. लोकसभेत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्यातून त्यांची जुनी मानसिकता बाहेर पडलेले आहे. यामध्ये नवीन असे काही नाही. त्यांचे जे काही जुने प्लॅन आहेत ते आता अंमलात आणण्यासाठी अडसर काँग्रेस पक्ष नसून बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे. तोच जळफळाट त्यांच्या वक्तव्यातून बाहेर आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आयोगासमोर सर्व मांडणार…
भिमा कोरेगाव आयोगावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आयोगाला आम्ही एक पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये आम्ही असे म्हणालो आहेत की, पुण्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दंगलीची बातमी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केव्हा कळवली. त्यांना ती कळवली नसेल तर का कळवली नाही. त्याचा शोध घेणे हे आयोगाचे मोठे काम आहे. 17 जानेवारी पुन्हा चौकशीसाठी वेळ दिला आहे. त्यावेळेस सर्व गोष्टी मी आयोगासमोर आणणार आहे.
बांगलादेशची वीज बंद करा…
बांगालादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, बांगलादेश परभणी येवढे आहे. तेथे हिंदूवर अस्त्याचार होत आहे, म्हणून परभणीत मोर्चा काढला गेला. पण केंद्रात तुमची सत्ता आहे. आपण बांगलादेशला वीज देत आहोत. ती बंद करा. त्यांच्या नाड्या आवळणे गरजेचे आहे. एकदा नियंत्रण सुटल की खालपर्यंत नियंत्रण सुटते. मी इथे सगळ काही बोलत नाही. आता वेळ अशी आली आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे.