प्रकाश आंबेडकर यांची ‘ही’ मोठी टीका कुणावर? ‘कुठला साप चावला ते…’
अजित पवार यांचा घोटाळा 70 हजार कोटींचा आहे. तुम्ही 10 हजाराची चोरी केली तर जेलमध्ये जाता. पण, जो 70 हजार कोटी चोरतो तो जेलमध्ये जात नाही. त्यामुळे तुम्ही मोठी चोरी करा. कारण चोरी मोठी केली की कारवाई होत नाही.
स्वप्नील उपम, अकोला | 25 ऑक्टोंबर 2023 : येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्षं आहे. जानेवारी, फेब्रुवारी नंतर लोकसभा होतील. पुढच्या नोव्हेंबर नंतर विधानसभा होईल. नंतर मनपा, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होतील. हे वर्ष आणि पुढचे वर्ष निवडणुकीचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एक निवडणूक येईल तोपर्यंत आपण केवळ सरकारला शिव्या देतो. चार राज्याच्या निवडणूका झाल्या की आज दिसणारा खेळ उलटा झालेला दिसेल. काही जणांच्या अंगात मरी आईचे भूत आल्यासारखे परिस्थिती आहे. पण, त्याच्या उताऱ्याचे औषध इथल्या मतदारांमध्ये आहे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय.
चोरी मोठी केली की कारवाई होत नाही
अकोट तेल्हारा रत्याची चाळणी झाली. अनेकांचे जीव गेले. या रस्त्यावर 100 पेक्षा अधिक लोकांचे जीव गेले. त्याचे कारण म्हणजे काम करणारे ठेकेदार पळून गेले. आपण निवडून दिलेले आमदार 20 ते 25 टक्के कमिशन मागतात. अजित पवार यांचा घोटाळा 70 हजार कोटींचा आहे. तुम्ही 10 हजाराची चोरी केली तर जेलमध्ये जाता. पण, जो 70 हजार कोटी चोरतो तो जेलमध्ये जात नाही. त्यामुळे तुम्ही मोठी चोरी करा. कारण चोरी मोठी केली की कारवाई होत नाही, अशी टीका त्यांनी केली.
वेगवेगळ्या समुहाला जाग करून पेटवलं
एक नाव शरद पवार यांचेही आहे. ज्यांना ज्यांना चौकशीला बोलावले आहे. त्यांना सांगितले की रत्यावर फिरायचं आहे की जेलमध्ये फिरायचं आहे. रत्यावर फिरायच असेल तर मी जे सांगतो ते करा आणि ते करत नसाल तर जेलमध्ये फेऱ्या मारा. कबाब, सबाब, महात्मा गांधी तुम्हाला वर्ज करावी लागेल. जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. पण, ओबीसी म्हणतात आमच्यामधील आरक्षण देऊ नका. नंतर, धनगर आरक्षण मागतात. नंतर आदिवासी मोर्चा काढतात. वेगवेगळ्या समुहाला जाग करून पेटवलं आहे. ते एकमेकांशी भिडतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पुन्हा त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही
G20 साठी 1 लाख 13 हजार कोटी खर्च केला. ते पैसे गोरगरीब कुटुंबाना वाटता आले असते. जगाचा नेता आहोत हे दाखवण्यासाठी हा खर्च आला. ज्याकडे 500 च्या नोटा आहे त्यांनी लवकर 100, 200 च्या करून घ्या. निवडणूक आली की हे एक एक नोट बदलतात. ते सगळ्यात मोठे चोर आहेत. काही झाले तरी पुन्हा त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही असे ते म्हणाले.
कुठला साप इंडियाच्या नेत्यांना चावला?
पुन्हा आम्हाला निवडून यायचं आहे असे काही जण ठाण मांडून बसले आहेत. काही जणांच्या अंगात मरी आईचे भूत आलेय. पण त्यांच्या उताऱ्याचे औषध इथल्या मतदारांमध्ये आहे. मतदाराला आता तांत्रिक बाबा व्हावे लागेल. ते मंत्र पेटीत गेले तर ते भस्म झाले म्हणून समजा. म्हणजे मोदींची सत्ता गेली. येणारा काळ हा दंगलीचा काळ आहे. येणाऱ्या काळात भाजप आणि आरएसएसच्या प्रचारला बळी पडू नका. लोकसभा निवडणूक आल्या की तुम्हाला तांत्रिक व्हावं लागेल असे आवाहन त्यांनी केले. तसेच, कुठला साप इंडियाच्या नेत्यांना चावला. हे तोंड उघडायलाच तयार नाही अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.