मुंबईतील जागांचा तिढा पोहचला दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड घेणार काँग्रेस हायकमांडची भेट
मुंबईतील जागांवरुन अजूनही महाविकासआघाडीत तिढा कायम आहे. काँग्रेसला मिळालेल्या जागांवरुन वर्षा गायकवाड नाराज आहेत. त्यातच मिळालेल्या दोन जागांपैकी एका जागेवर ठाकरे गटाकडून दावा केला जात असल्याने वर्षा गायकवाड थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांड यांची भेट घेण्यासाठी गेल्या आहेत.
महाविकासआघाडीत मुंबईतील जागांवरुन तिढा सुरु असताना वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो नंतर सुटला. पण असं असलं तरी अजून काही जागांवरुन तिढा कायम आहे.
मुंबईतील जागांवरुन तिढा
मुंबईतील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे. मुंबईत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत. काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा आम्हाला मिळाली तर आम्ही विजय मिळवून दाखवू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत ठाकरे गटाला ४ जागा तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं अद्याप आपला उमेदवार दिलेला नाहीये.
मुंबईत काँग्रेसला दोन जागा
काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी उत्तर मुंबईची जागा मिळाण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील हायकमांडसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे त्या आज दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
उत्तर मुंबईतून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण पियूष गोयलांविरोधात काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार नसल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे येथे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी आहे.