सांगलीत ट्विस्ट, काँग्रेस नेत्यांचा उमेदवारीचा दावा असताना शालिनीताई पाटील यांची मोठी भविष्यवाणी

| Updated on: Apr 11, 2024 | 8:41 PM

शालिनीताई पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होईल? याबाबत थेट उत्तरच देवून टाकलं आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद टोकाला पोहोचल्याचं बघायला मिळालं आहे.

सांगलीत ट्विस्ट, काँग्रेस नेत्यांचा उमेदवारीचा दावा असताना शालिनीताई पाटील यांची मोठी भविष्यवाणी
शालिनीताई पाटील
Follow us on

सांगली लोकसभा मतदारसंघाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील निवडून आले आहेत. संजय काका पाटील या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचा विजयाची हॅट्ट्रीक मारण्याचा निर्धार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकांच्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून त्यांना निवडणुकीची तयार करण्याचेदेखील आदेश देण्यात आले होते. पण ऐनवेळी ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला. ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच धुसफूस बघायला मिळाली. या सगळ्या घडामोडींनंतर आता वसंत दादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शालिनीताई पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होईल? याबाबत थेट उत्तरच देवून टाकलं आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद टोकाला पोहोचल्याचं बघायला मिळाले. सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी काल नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमदार विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगलीच्या जागेबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. तसेच सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं हा महाविकास आघाडीचा निर्णय आम्हाला पचनी पडणारा नाही, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

सांगली काँग्रेसकडून अद्याप चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर नाही

विशेष म्हणजे विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट करावं, असं सांगितलं होतं. विश्वजीत कदम हे स्वत: विशाल पाटील यांना घेऊन नवी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटून आले. पण तरीही महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्रकार परिषदेत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस उमेदवार असल्याने सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. असं असलं तरी सांगलीच्या काँग्रेस नेत्यांकडून अद्याप चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी काम करु किंवा त्यांना जिंकून आणू, पाठिंबा देऊ, असं जाहीर करण्यात आलेलं नाही.

शालिनीताई यांच्याकडून कोण जिंकणार? याबाबत भविष्यवाणी

या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आम्ही फोनवरुन शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकून येईल, याबाबत शालिनीताई यांनी भविष्यवाणी सांगितली. दोनवेळचा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विचार करूनच त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला असावा. काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी विचार करुन हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली.