नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाचा अलर्ट, पुढील दोन दिवसात…
नागपूर हवामान विभागाने विदर्भात येणाऱ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. द्रोणिका आणि चक्रवाती वाऱ्यामुळे बंगालच्या खाडीतून बाष्पयुक्त वारे विदर्भात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. परंतु, उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच आता हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका (अप्पर टफ वे) आणि चक्रवाती वारे तयार झाले आहेत. यामुळे बंगालच्या खाडीतून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे विदर्भाकडे वाहत आहेत. याच कारणामुळे काही भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू शकतो, ज्याची गती ताशी ४० ते ५० किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) April 15, 2025
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, विदर्भातील तापमान इतर दिवसांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा पावसाची शक्यता असल्याने दिवसाच्या तापमानावर विशेष परिणाम जाणवणार नाही. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
तसेच कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील इतर अनेक भागांमध्ये लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याने नागरिकांना उकाड्यांपासून दिलासा मिळेल.
राज्यात पावसाळी वातावरण
काही दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. मात्र आता तो निवळला आहे. राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा अजूनही ४० अंशांच्या आसपास आहे. मात्र, किनारपट्टीवरील तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे.