आमदार म्हणतात, या विषयावर बोलणार नाही? उपसभापती म्हणाल्या असं का?
तत्कालीन परवाना अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करुन मच्छिमारांकडून पैसे उकळले. स्थानिक मच्छिमार संघटना आणि नागरिकांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले. पारंपारिक परवानाधारक मच्छिमार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुंबई । 28 जुलै 2023 : विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरु होती. आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या गावरान जमिनींबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना उपप्रश्न विचारायचा होता. मात्र, त्यांना प्रश्न विचारण्यास उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परवानगी नाकारली. यांनतर आणखी एक प्रश्न पुकारण्यात आला. या दोन्ही प्रश्नांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तरे दिली. याचवेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुढील लक्षवेधी पुकारली.
गडचिरोलीचे आमदार आमशा पाडवी यांची ही लक्षवेधी सूचना होती. मत्स्यव्यवसाय मंत्री त्याला उत्तर देणार होते. कोकण किनारपट्टी क्षेत्रात अनधिकृत होत असलेल्या मच्छिमारीबाबत हा प्रश्न होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पारंपारिक मच्छिमार आणि पर्ससिन मच्छिमार यांच्यात वाद असणे. येथे अनधिकृत पर्ससिन, एल.ई.डी धारक बेकायदेशीररित्या मच्छिमारी करत आहेत.
मच्छिमारांकडून तत्कालीन परवाना अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करुन मच्छिमारांकडून पैसे उकळले. स्थानिक मच्छिमार संघटना आणि नागरिकांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पारंपारिक परवानाधारक मच्छिमार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबाबत ही लक्षवेधी मांडण्यात आली होती.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही लक्षवेधी पुकारली. मात्र, आमदार आमशा पाडवी यांनी ‘मी काय या विषयावर बोलणार नाही.’ असे सांगितल्याने सभागृहात एकच खळबळ माजली. याचे कारण सांगताना आमदार पाडवी म्हणाले, माझी जी लक्षवेधी स्वीकृत झाली होती ती दिली नाही. दुसरी लक्षवेधी दिली म्हणून मी या विषयावर काही बोलणार नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. माझ्या जिल्ह्याचा विषय सोडून मला दुसरा विषय दिला असा आरोप केला.
आमदार पाडवी यांच्या या आरोपानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, आमदार पाडवी यांनी चार प्रायॉरीटी लक्षवेधी दिल्या होत्या. मात्र, त्या चारही लक्षवेधी घेणे शक्य असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच ही लक्षवेधी सूचना लावण्यात आली. त्यावेळी त्यांना आम्ही मच्छिमार यांच्याशी तुमचा काय संबंध असेही विचारले होते.
त्यावेळी त्यांनी सांगितल्यानुसारच ही लक्षवेधी सूचना लावण्यात आली. मात्र आता नाही म्हणत आहेत, असं का? त्यांना प्रश्न विचारायचा नसेल तर ठीक आहे. आमदार पाडवी यांच्याशी चर्चा करून त्यांना हवी ती लक्षवेधी लावू असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. मात्र, आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेची एकच चर्चा रंगली होती.