Valentine’s Day | राजीवजी.. तुम्ही जिथे असाल, तुम्हाला एकच सांगते, पतीच्या आठवणींनी डॉ. प्रज्ञा सातव हळव्या
डॉ. राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर राजीव सातव यांच्या निधनाने दोघांची ताटातूट झाली, तरी आपल्या मनात पतीविषयीच्या प्रेम भावना कायमच राहणार असल्याचं प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : काँग्रेसचे तत्कालीन राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) यांचे गेल्या वर्षी कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले होते. 16 मे रोजी पुण्यात सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव यांच्या निधनानंतर हा पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day) आहे. साहजिकच त्यांची पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr Pradnya Rajeev Satav) यांच्या मनात पतीच्या आठवणी दाटून आल्या आहेत. प्रज्ञा सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, माझे कालही तुमच्यावर प्रेम होते, आजही आहे आणि उद्याही असेल, मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन, अशा आशयाच्या ओळी प्रज्ञा सातव यांनी ट्वीट केल्या आहेत.
डॉ. राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर राजीव सातव यांच्या निधनाने दोघांची ताटातूट झाली, तरी आपल्या मनात पतीविषयीच्या प्रेम भावना कायमच राहणार असल्याचं प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केलं आहे.
काय आहे डॉ. प्रज्ञा सातव यांचे ट्वीट
“प्रिय राजीव जी, तुम्ही कुठेही असाल तरी, या व्हॅलेंटाईन डे निमित्त मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझे कालही तुझ्यावर प्रेम होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते. उद्याही मी तुमच्यावर प्रेम करत राहीन. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहीन.” अशा आशयाचे ट्वीट प्रज्ञा सातव यांनी केले आहे.
Dear Rajeev Ji , On this Valentine’s Day wherever you are I want to tell you that , I loved you yesterday. I love you today. I will love you tomorrow. I will love you forever.❤️❤️ ❤️ pic.twitter.com/SwzPYuQES5
— Dr Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) February 13, 2022
काँग्रेस नेते डॉ. राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. डॉ. सातव यांनी हिंगोलीतून लोकसभेची खासदारकीही भूषवली होती. ते राहुल गाँधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात.
प्रज्ञा सातव विधान परिषदेवर
दरम्यान, राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली.
संबंधित बातम्या :