कमलापुरातले हत्ती गुजरातला नेण्याचा प्लॅन, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय? वाचा सविस्तर
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापुर येथील हत्ती गुजरात येथे नेण्याचा प्लान होता, असा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) यांनी केल्याने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या अनेक मोठ्या संस्था, कंपन्या, महत्वाची कार्यालये भाजप (Bjp) गुजरातला नेत असल्याचा आरोप गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी करत आहे, त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातील कमलापुर येथील हत्ती गुजरात येथे नेण्याचा प्लान होता, असा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) यांनी केल्याने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आता तिथेच भव्य एलीफंट पार्क तयार करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवलंय, मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये हत्ती नेण्याचा प्लान रद्द होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
लोकलबाबत काहीही निर्णय नाही
राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, कालच रुग्णवाढीचा आकडा हा 46 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागातील जनतेनं अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. सध्या लागू केलेले निर्बंध 15 फेब्रुवारीपर्यंत असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच लोकलबाबत काहीही निर्णय नाही, शाळा सुरु करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
आरोप करणारे कोण नालायक?
महाज्योतीतून विद्यार्थ्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिल्याचा आरोप करणारे कोण नालायक आहेत? नालायक हा शब्द मुद्दाम वापरतोय. अर्धवट माहितीच्या आधारे मुर्खासारखे आरोप करतात. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. करडई चं बियाणं शेतकऱ्यांना दिलंय, त्यावर प्रक्रिया करुन क्लस्टर तयार करणार. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.