‘वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?’; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
"पोस्को सारख्या घटना झाल्या. खुनाचे प्रकरण दाबली गेली. आरोपी मोकाट आहे. आकाच्यावर बाका आहे, तो सुद्धा राजकीय राजाश्रय असल्याशिवाय न्यायाची अपेक्षा करू शकणार नाही. सरकारची इतकी बदनामी होत असताना शांतपणे बसले आहेत", असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराला सोडणार नाही. त्यांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली होती. आता काय झालं? अनेक खून झाले. वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याचा अनेक झालेल्या घटनांमध्ये सहभाग आहे का? ते बघितलं पाहिजे. खंडणीखोर, हफ्तेखोर, कायदा-सुव्यवस्था तुडवणारा हा सरकारचा जावई आहे का? कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे?”, असे सवाल विजय वडेट्टीवार यांना केले आहेत.
“कोणी पत्रकार परिषद घेऊ दे. संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू दिसत नाही. मानवतेला काळीमा फासणारा अमानुषपणे खून झाला. न्यायासाठी त्या पोरीचे अश्रू दिसत नाही. पोस्को सारख्या घटना झाल्या. खुनाचे प्रकरण दाबली गेली. आरोपी मोकाट आहे. आकाच्यावर बाका आहे, तो सुद्धा राजकीय राजाश्रय असल्याशिवाय न्यायाची अपेक्षा करू शकणार नाही. सरकारची इतकी बदनामी होत असताना शांतपणे बसले आहेत. प्रॉपर्टी जप्त केली. अनधिकृतपणे संपत्ती बनवली आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
‘…तर असंतोषाचा उद्रेक होईल’
“ही प्रवृत्ती महाराष्ट्रात ठेचली पाहिजे. असे सांड मोकटपणे फिरतील. हजारो खून पचवतील, महिलांवर अत्याचार होतील. जमिनी बळकावली जातील. मोठा कंत्राटदार गेला तर खंडणी द्यावी लागते, जे बीडमध्ये सुरू आहे. बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेतली पाहिजे. माझी मागणी आहे. सरकारने मनात आणले तर २४ तासात अटक करू शकतात. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर असंतोषाचा उद्रेक होईल. पहिले आरोपीला बेड्या घाला”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
‘…तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?’
“मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. मुख्य आरोपी वाल्मिकी कराड. वाल्मिकी कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे एकच आहेत. व्यवहार एकत्र, जमिनी, बिझनेस एकच, घट्ट मैत्रीचे सबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला केल्याशिवाय न्याय मिळणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“पोलीस काय करतात? गृह खाते काय करत आहे? परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना धार आली होती. मग बीडमध्ये का कारवाई होत नाही? आता आरोपींवर कारवाई करताना लकवा मारला का? सरकार पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? भाषणांपेक्षा कृतीतून दाखवा, कोणाला पाठीशी घालत नाही ते”, असं विजय वडेट्टीवार यांनी सुनावलं आहे.