गाव कोरोनामुक्त ठेवणारच, 19 जिल्ह्यातील सरपंचांकडून मुख्यमंत्र्यांना विश्वास
संवादादरम्यान उपस्थित सरपंचांनी त्यांच्या कोरोनामुक्त गावाच्या वाटचालीची माहिती देत केलेले प्रयत्न, उपाययोजना आणि राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मुंबई : प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या-मुरळी यांच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध गावांच्या सरपंचांना दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट गावात येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता गावांनी यासंबंधीचा निर्णय घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, सावधानता बाळगत नियमांचे पालन करावे आणि आपली गावे कोरोनामुक्त ठेवावीत, असे आवाहनही त्यांनी सरपंचांना केले. (village will be kept corona free, Sarpanch from 19 districts have assured CM Uddhav Thackeray)
या संवादादरम्यान उपस्थित सरपंचांनी त्यांच्या कोरोनामुक्त गावाच्या वाटचालीची माहिती देत केलेले प्रयत्न, उपाययोजना आणि राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील 19 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
जनहितासाठी समाजमाध्यमांचा उपयोग
मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हटले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खूप नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत, मी तुम्हाला सूचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खूप चांगली माहिती मिळाली आहे ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहात. व्हॉटसअप ग्रुप निर्माण करत त्याद्वारे माहितीची देवाण घेवाण करत आहात, जनजागृती करत आहात. ही कामे खरच खूप कौतुकास्पद आहेत.
लसीमुळे घातकता कमी
लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र शासनाने घेतली असल्याचे सांगतांना जसजसे लसीचे डोस उपलब्ध होतील त्याप्रमाणे लस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लस घेतल्यास कोरोना होत नाही असे नाही, परंतू घातकता कमी होते हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्र्यांनी गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी सरपंच करत असलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. तुम्ही सावधपणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत पुढे चालत राहा, तुमच्या कोरोनामुक्त गावाच्या चळवळीला ताकद देण्याचे तसेच तुमच्या प्रत्येक पाऊलासोबत तुमच्यासोबत राहण्याचे काम शासन करील अशी ग्वाहीही यानिमित्ताने दिली.
वस्तीनिहाय समूह तयार करा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकसंख्येनुसार वस्तीनिहाय टीम तयार करा, या टीमने ती वस्ती सांभाळावी, तिथल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे असले तरी कुणालाही या रुग्णालयात येण्याची गरज पडूच नये, इतके लोक आरोग्यसंपन्न रहावेत, असे झाल्यास हा खरा विकास आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी ऑनलाईन संवाद साधला आणि कोविड संदर्भात ते करीत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif, राज्यमंत्री @AbdulSattar_99 आदी उपस्थित होते. pic.twitter.com/VsSGCjSmwH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 11, 2021
ग्रामविकास मंत्र्यांकडून गावे कोरोनामुक्त करण्याचा विश्वास
कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गावे कोरोनामुक्त करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक सुविधांसाठी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी दिल्याची माहिती दिली. कोरोना मुक्त गावाची स्पर्धा ही स्पर्धा न रहाता लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली
या गावांमधील सरंपंचांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
औरंगाबाद विभाग जिल्हानिहाय गावे (कंसात तालुका) : औरंगाबाद – कुंभेफळ (औरंगाबाद). बीड – लुखेगाव (माजलगाव). जालना – रांजणी (घनसांवगी), जयपूर (मंठा). उस्मानाबाद –शिंगोली (ता. उस्मानाबाद). नांदेड – भोसी (भोकर). लातूर – सिकंदरपूर (लातूर), अलमला (औसा). परभणी – खडगाव (गंगाखेड). हिंगोली – मेठा (औंढा-नागनाथ).
नागपूर विभाग : भंडारा –शहापूर (भंडारा). चंद्रपूर – जाम तकुम (पोंभुर्णा), राजगड (मुल). गोंदिया – करंजी (आमगाव). नागपूर – पिंपळगाव (हिंगणा), शिरपूर (नागपूर ग्रामीण).
अमरावती विभाग : अकोला – कापसी रोड (अकोला). अमरावती – धामणगाव बधे (मोताळा). यवतमाळ – अकोला बाजार (यवतमाळ), खडका (महागाव). वाशिम – गोवर्धन (ता. रिसोड)
इतर बातम्या
“डॉ. आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकरची पात्रता नाही”, काँग्रेस नेत्याची जहरी टीका
(village will be kept corona free, Sarpanch from 19 districts have assured CM Uddhav Thackeray)