साईभक्तांना नवीन वर्षाची भेट, सर्वसामान्य भाविकांना मिळणार व्हिआयपी आरतीचा लाभ
पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर संस्थानकडून साईभक्तांसाठी नव वर्षाची नवी अनोखी भेट दिली आहे. व्हिआयपी आरती थेट साई समाधीजवळ उभे राहून करता येते. दिवसभरातील मध्यान, धुपारती आणि रात्रीच्या शेज आरतीत ही संधी मिळणार आहे.
देशात तिरुपती बालाजीनंतर शिर्डीतील साई मंदिर सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक आणि व्हिव्हिआयपी येत असतात. साई मंदिरात साई बाबांची व्हिआयपी आरती करण्याचा मान फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींना दिला जात होता. परंतु नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा संस्थानने नियमात बदल केला आहे. या संस्थानने नवीन उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार सर्वसामान्य भाविकांना साई मंदिरातील व्हिआयपी आरतीचा लाभ मिळणार आहे.
साई मंदिर संस्थानच्या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना व्हिआयपी आरतीचा लाभ मिळणार आहे. सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या दोन भाविकांना व्हिआयपी आरती करता येणार आहे. या व्हिआयपी आरती फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच करता येत होती. परंतु हा लाभ सामान्य भाविकांना देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्याला सुरुवात आजपासून करण्यात आली.
थेट साई समाधीजवळ करता येणार आरती
पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर संस्थानकडून साईभक्तांसाठी नवे वर्षाची नवी अनोखी भेट दिली आहे. व्हिआयपी आरती थेट साई समाधीजवळ उभे राहून करता येते. दिवसभरातील मध्यान, धुपारती आणि रात्रीच्या शेज आरतीत ही संधी मिळणार आहे. त्यानुसार बुधवारी झांसी येथील मनिष रजक आणि त्यांची पत्नी पुजा रजक या दांम्पत्यास व्हीआयपी आरतीचा लाभ मिळाला. आरतीचा मान मिळाल्यानंतर रजक दांम्पत्य भावूक झाले.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी
नवीन वर्षाची सुरूवात साई मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची शिर्डीत अलोट गर्दी झाली. भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर खुले ठेवल्याने लाखोंच्या संख्येने भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.