महाराष्ट्रातील एक गाव चोरीला ? साडेचार हजार हेक्टर शेतजमीनचे गाव गेले तरी कुठे ?
Marathi News: महाराष्ट्रातील एक गाव हरवले आहे. गावात जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन आहे. परंतु या जमिनीची नोंद महसुली विभागाकडे नाही. गावातरी एकाही व्यक्तीकडे जमिनीचा सातबारा नाही. आता हे गाव शोधण्याची शासकीय प्रक्रिया सुरु आहे. त्याला किती कालावधी लागणार?
यशपाल भोसले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नांदेड, 15 डिसेंबर | महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ६३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन या गावात आहे. परंतु या गावाची नोंदच शासन दरबारी नाही. महसूल विभागाकडे गावासंदर्भात माहिती नाही. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर हे गाव नाही. यामुळे या गावाचे अस्तित्व अधांतरी आहे. हे गाव चोरीला गेले की काय? अशी चर्चा नेहमीच गावकरी करत असतात. या गावातील गावकऱ्यांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड आहे. गावात जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन आहे. परंतु या जमिनीची नोंद महसुली विभागाकडे नाही. गावातरी एकाही व्यक्तीकडे जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अशा कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे गावात नाहीत.
हे गाव आहे तरी कुठे
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आता ६३ वर्ष झाली आहे. परंतु राज्यात असलेले एक गाव नकाशावरच नाही. हे गाव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात वाघदरी आहे. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावाला मिळत नाही. अडीचशे लोकसंख्येच हे गाव आहे. परंतु गावात रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष या गावाकडे जात नाही.
जंगलातून जीव मुठीत घेऊन पायपीट
तेलंगणा सीमेवर लागून महाराष्ट्राच्या हद्दीत वाघदरी हे गाव आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आले. पण तेलंगणा सीमेवर असलेले हे गाव मात्र अजूनही महाराष्ट्राच्या नकाशावर आले नाही. महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाही. गावकऱ्याकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड आहे. परंतु रस्ते नाही. यामुळे सात किलोमीटर जंगलातून जीव मुठीत घेऊन वाघदरी गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागते.
महसुली नोंद नसल्याने नकाशावर नाहीच
वाघदरी गावातील हे गावकरी महाराष्ट्रतील आहे. परंतु या गावाची महसुली नोंद नाही. या गावाची महसुली नोंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून गावकरी करत आहेत. पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. दरम्यान किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी आता गावाची आकार बंदी आणि जमिनीची मोजणी सुरू असल्याचे सांगितले. ही प्रकिया पूर्ण करुन महसुली नोंद घेण्याच्या प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे . या प्रक्रियेला बराच काळ लागणार आहे. यामुळे गाव अस्तित्वात असले तरी शासन दरबारी चोरीला गेले असल्याचे म्हणावे लागले.