वर्ध्यात railway तिकिटांचा काळाबाजार; ग्लोबल इंटरनेट कॅफेत छापा, RPF जवानांची कारवाई
वर्धा येथे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार समोर आलाय. ग्लोबल इंटरनेट कॅफेत छापा टाकण्यात आला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी केली. ग्लोबर इंटरनेट सीएससी सेंटरविरोधात कारवाई करण्यात आली.
वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला (Railway Security Force) मिळाली होती. वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्तद्वारा (Senior Board Safety Commissioner) रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी शहरातील ग्लोबर इंटरनेट सीएससी सेंटरवर (Glober Internet CSC Center) छापा मारला. यात 10 जुन्या आरक्षित तिकिटा तसेच इतर साहित्य असा एकूण 22 हजार 299 रुपयांचं मुद्देमाल जप्त करीत आरोपीस बेड्या ठोकल्या.
10 जुन्या आरक्षित ई तिकीट जप्त
रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या प्रकरणी आरोपी वर्धा येथील शिवाजी नगर देवळी रोड शेख इमरान (33) याला अटक केल्याची माहिती दिली. आरपीएफ जवानांनी कॅफेतून 14 हजार 299 रुपये किंमतीच्या 10 जुन्या आरक्षित ई तिकीट, एक मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, किबोर्ड तसेच आदी साहित्य असा एकूण 22 हजार 299 रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आरपीएफ वर्धा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन वैयक्तिक आयडी मिळाल्या
इंटरनेट कॅफेतील संगणकाची तपासणी केली असता नवाज एस. के आणि इमरान 1989 अशा दोन वैयक्तिक एजंट आयडी मिळून आल्या. याचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक दत्ता इब्बिटवार करीत आहेत. यापूर्वीही निरीक्षक विजय त्रिपाठी तसेच सीआईबी नागपूर येथील निरीक्षक सुधीर मिश्रा यांच्या सूचनेनुसार छापेमारी केली जात होती. ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय, कोटा जोजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.