29 वर्षे देशाची सेवा केली, कर्तव्यावर असताना गेला जवानाचा जीव, मुलाने दिला मुखाग्नी
देवेंद्र वानखडे यांनी देशासाठी तब्ब्ल २९ वर्षे सेवा दिली. निवृत्तीनंतरचा वेळ ते कुटुंबासोबत घालवणार होते. पण, कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती खराब झाली.
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील रहिवासी असलेले जवान सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. सीआरपीएफ दलामध्ये कार्यरत असलेले जवान देवेंद्र शामराव वानखडे यांचा त्रिपुरा येथे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. देवेंद्र यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी २७ जुलै रोजी त्यांना वीरमरण आले. आज त्यांच्यावर वाशिम जिल्ह्यातील बेंबळा या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवान देवेंद्र वानखेडे यांचा मुलगा अमित यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तसेच सी.आर.पी.एफ बटालीयन आणि पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान देवेंद्र वानखेडे यांना मानवंदना दिली.
निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर
देवेंद्र वानखडे हे एका सामान्य कुटुंबातील. त्यांनी २९ वर्षे देश सेवा केली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. भारत मातेच्या या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोचा जनसागर उसळला होता. वीर जवान देवेंद्र वानखडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
महसूल आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मृत्युपश्चात त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. एक कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवानाला दिला शेवटचा निरोप
देवेंद्र वानखडे यांनी देशासाठी तब्ब्ल २९ वर्षे सेवा दिली. निवृत्तीनंतरचा वेळ ते कुटुंबासोबत घालवणार होते. पण, कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती खराब झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मृतदेह पाठवण्यात आला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जवानाला कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शेवटचा निरोप दिला.