सहावीतल्या मुलानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, अनुदान पाठविण्याची मागणी, अशी झाली मदत
भाजप भटक्या विमुक्त जमातीच्या पश्चिम विदर्भ संयोजिका डॉ. जयश्री गुट्टे यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रतापला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.
विठ्ठल देशमुख, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, वाशिम : पावसानं सोयाबीन वाहून नेलं. त्यामुळं मायनं घरात पुरणाची पोळी केली नाही. माय म्हणे सरकार अनुदान टाकल्यावर दिवाळीले पुरणाच्या पोया करु. बाजूच्या जयपूर गावात शेतकर्याने फाशी घेतली. त्यामुळं मी जास्त बोललो तर आमच्या घरातही काही वाईटवंगाळ होईल याची भीती वाटते. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब तुम्ही लवकरात लवकर अनुदान पाठवा. आमच्या घरी दिवाईले पुरणपोया खायला या.’ अशी भावनिक साद लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या वर्ग सहावीतील चिमुरड्या प्रताप जगन कावरखे या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून घातली.
हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. या पत्रात प्रतापने बोबड्या भाषेत लिहिलेले शब्द वाचून अनेक संवेदनशील मनाला चिरे पडले. शेतकर्याचे दु:ख काय असते, हे या शेतकरीपुत्राने अजाणत्या वयात नेमके जाणून ते शब्दातून मांडले.
हे पत्र सोशल मीडियातून नजरेस पडले. भाजप भटक्या विमुक्त जमातीच्या पश्चिम विदर्भ संयोजिका डॉ. जयश्री गुट्टे यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रतापला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. दिवाळीला त्याच्या घरातील पुरणपोळीची व्यवस्था केली.
प्रतापचे वडील जगन कावरखे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेले सोयाबीन परतीच्या पावसाने पुरते वाहून नेले. त्यामुळे शेतकरी कावरखे हे हवालदिल झाले आहेत. दिवाळी तोंडावर आली असून शासनाची अद्यापही काहीच मदत नाही.
त्यामुळे पत्नीला, मुलांना सणासाठी कपडे कसे घ्यावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात प्रतापने लवकरात लवकर पैसे पाठवून मुख्यमंत्र्यांना आपल्या घरी पुरणपोळी खाण्याचे आमंत्रण दिले होते. त्यात सर्वात शेवटी तुमचा आणि बाबांचा लाडका प्रताप असेही त्याने नमूद केले होते.
तसेच पुरणपोळीसाठी बाबासोबत भांडलो तर आईने बाजूच्या जयपूर गावातील शेतकर्याने घेतलेल्या फाशीची घटना सांगितली. त्यामुळे आपण आता पुरणपोळीसाठी आईसोबत हट्ट धरणार नाही, असेही चिमुकल्या प्रतापने नमूद केले होते.
खेळण्या बागडण्याच्या वयात शेतकर्यावर अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटाची जाण प्रतापला आली. प्रतापचे हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पत्रातून प्रतापने लिहिलेले शब्द अनेकांच्या ह्दयाला भिडले.
या पत्राची दखल घेवून डॉ. जयश्री गुट्टे यांनी प्रताप व त्याच्या वडिलांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांना दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली. सामाजिक संवेदनशिलतेचे भान जपून शेतकरीपुत्राला केलेल्या मदतीमुळे डॉ. गुट्टे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.