वडिलांचं उत्पन्न 40 कोटी, तरीही ओबीसी प्रवर्गातून IASची परीक्षा, पूजा खेडकर यांच्यावर आरटीआय कार्यकर्त्याचा गंभीर आरोप
ओबीसीमधून त्यांनी IAS ची परीक्षा दिली. खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, असेही विजय कुंभार म्हणाले.
IAS probationer Pooja Khedkar Allegation : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तिच्याविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या. यानंतर महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक सचिव एस एम महाडिक यांनी याबद्दल परिपत्रक काढले आहे. पूजा खेडेकर या नियुक्ती आणि प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरच्या संशयास्पद घटना यामुळे चर्चेत आहेत. त्यातच आता एका आरटीआय कार्यकर्त्याने पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पूजा खेडकर या ट्रेनी अधिकारी असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून विविध विशेषाधिकारांची मागणी करत आहेत. खासगी वाहन असलेल्या ऑडीसाठी लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची सुद्धा मागणी पूजा खेडकर यांनी केली होती. पूजा खेडकर यांना अद्याप हे विशेषाधिकार मिळालेले नाहीत, पण तरीही त्या सतत या मागण्या करत होत्या. यानंतर आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर यांच्या IAS नियुक्तीवर संशय व्यक्त केला आहे.
आरटीआय कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी
पूजा खेडकर या IAS कशा झाल्या यावरुन वाद आहेत. परीक्षार्थी असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणे, अधिकाऱ्यांना त्रास देणे, या गोष्टी सातत्याने होत होत्या. यामुळे मी चौकशीच्या मागे लागलो आणि त्याबद्दल तक्रार केली. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिव यांना पाठवला. त्यानंतर मग पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली झाली. पण ही बदली होऊ शकत नाही, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
पूजा खेडकर यांच्यावर जे आरोप आहेत, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. IAS झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती. त्या सहा वेळेस अनुपस्थित राहिल्या. तसेच ओबीसीमधून त्यांनी IAS ची परीक्षा दिली. खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, असेही विजय कुंभार म्हणाले.
पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ
नॉनक्रिमीलेयर दाखल्यात वडिलांचं उत्पादन ग्राह्य धरले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. तसेच त्यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे स्वतः लिहून दिलेलं आहे. त्यामुळे IAS हे अत्यंत प्रतिष्ठेची सेवा आहे. त्यात अशा व्यक्ती असणं चुकीचं आहे, असेही विजय कुंभार म्हणाले. त्यामुळे सध्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
कोण आहेत पूजा खेडकर?
पूजा खेडकर या 2022 च्या बॅचची IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. तिने UPSC परीक्षेत 821 (Pwd-5) रँक मिळवल्याचे सांगितले जाते. त्या पुण्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र आता वाशिममध्ये बदली झाली आहे. पूजा खेडकरचे आजोबा सरकारी कर्मचारी होते. तर वडील दिलीपराव खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) निवृत्त अधिकारी होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या निवडून आलेल्या सरपंच आहेत.