वाशिम पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, ‘त्या’ महिलेच्या हत्येचं गूढ उकललं, बकऱ्या चारायला गेली आणि…
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या ३५ वर्षीय सोनाली कोडापे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
तारीख 3 जानेवारी 2025. एक महिला बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेली. पण ती परत घरी आलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. यावेळी ती एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. गावकऱ्यांनी ती जिवंत आहे का? हे तपासून पाहिलं. पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता. तिच्यावर झालेला हल्ला इतका भीषण होता की, तिचा त्यात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला होता. एक महिला शेळी चारण्यासाठी शेतात जाते आणि तिची अशाप्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात येते, या वस्तुस्थितीमुळे आख्खं गाव हादरुन जातं. अनेकांकडून महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जातो. या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास केला आणि अखेर महिलेची हत्या करणाऱ्या 2 नराधमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे शेत शिवारात एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृत महिलेचे नाव सोनाली लवलेश कोडापे असं होतं. ती खेर्डा गावाची रहिवासी होती. सोनाली बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेली होती. मात्र, ती बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी सोनालीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज तेव्हाच व्यक्त करण्यात आला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता.
आरोपींची पोलिसांकडे कबुली
या प्रकरणातील दोन आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड आणि किशोर ऊर्फ बाबू कोवे अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने विरोध करून गावात तक्रार करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी धारदार विळ्याने तिची हत्या केली, अशी कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
महिलेचा मृतदेह गावालगतच्या शिवारात आढळून आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित संदीप गायकवाडला नांदुरा रेल्वे स्टेशनजवळ अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचा साथीदार किशोर कोवेचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. सध्या दोन्ही आरोपी कारंजा पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.