संरक्षणमंत्री झाल्याशिवाय नगर जिल्ह्याचे प्रश्न सुटणार नाहीत; सुजय विखेंची टोलेबाजी
नगरमधील रस्त्याशी निगडीत प्रत्येक कामे संरक्षण मंत्रालयाशी निगडीत असल्याने आता संरक्षण मंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी मिश्किल कोटीच सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.
नगर: नगर जिल्ह्यातील रस्त्यांमुळे केवळ नगर जिल्ह्यातील लोकच त्रस्त नाहीत. तर खुद्द भाजपचे खासदार सुजय विखे-पाटीलही त्रस्त झाले आहेत. नगरमधील रस्त्याशी निगडीत प्रत्येक कामे संरक्षण मंत्रालयाशी निगडीत असल्याने आता संरक्षण मंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी मिश्किल कोटीच सुजय विखे-पाटील यांनी केली आहे. (we can solve all problems after became defence minister says sujay vikhe patil)
नगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरण आणि नुतनीकरणाच्या कामाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी हे मिश्किल भाष्य केलं. आपल्या जिल्ह्यात संरक्षण खात्याशी संबंधित कामे सर्वाधिक आहेत. प्रत्येक रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परनागी लागते. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी संबंधित आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री झाल्याशिवाय आपल्या जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत, असं मिश्किल भाष्य सुजय यांनी करताच एकच खसखस पिकली.
इथल्या चार पदरी रस्त्याचे काम लवकर सुरू आहे. त्याचा प्रस्ताव नॅशनल हायवेकडे पडून आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन कामाला सुरुवातही करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या राजकारणात खोटं बोलण्याचे धंदे
यावेळी त्यांनी राजकारणातील दांभिकतेवरही प्रहार केले. सध्या राजकारणात खोटं बोलण्याचे धंदे जोरात सुरू असल्याचं सांगताना त्यांनी एक गोष्टही सांगितली. एखादी व्यक्ती डॉक्टरकडे जाते. तेव्हा डॉक्टर त्याला थोडं फ्रॅक्चर सारखं वाटत असेल तर व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पण त्या व्यक्तीला तो सल्ला पडत नाही. मग तो पुढच्या डॉक्टरकडे जातो. तेव्हा दुसरा डॉक्टर त्याला क्रॅक्शन लावून बरं होईल म्हणून सांगतो. त्या व्यक्तीला या डॉक्टरचाही सल्ला पटत नाही. मग तो आणखी तिसऱ्या डॉक्टरकडे जातो. हा डॉक्टर मात्र त्याला तुम्ही एक महिना उशिरा आला असतात तर गडबड झाली असती असं सांगत ऑपरेशन करण्याचा सल्ला देतो. त्यावेळी त्या माणसाला मात्र हा डॉक्टर खरा असल्याचा साक्षात्कार होतो. राजकारणातही हेच धंदे सुरू आहेत. खोटं बोला पण रेटून बोला असं सुरू आहे. केंद्रात जे होतं ते आमच्यामुळे होतं. राज्यात जे होतं ते आमच्यामुळे होतं, असे दावे केले जातात. मग आम्ही काय चने-फुटाणे खाण्यासाठी खासदार झालो आहोत काय?, असा सवाल करतानाच खोटं बोलणं हा आपला पिंड नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
संबंधित बातम्या:
नगरमध्ये कोण कुणाचा गुरु आणि कोण कुणाचा शिष्य काही उमजत नाही, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी
नगरमध्ये के के रेंज विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, सुजय विखेंचा राज्य सरकारवर निशाणा